कुंभारझरी येथील हरिभक्त परायण सोनवणे महाराज यांची शिस्तप्रिय दिंडी, जाफराबाद तालुक्यातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
पेरणीची कामे आटोपून हभप सोनवणे गुरुजींच्या नेतृत्वाखालील स्वग्राम पायी दिंडीत शेतकरी महिलांचा मोठा सहभाग पाऊस पडून शेतातील पेरणीची कामे आटोपल्याने जाफ्राबाद तालुक्यातील शेकडो शेतकरी महिला यंदा पायी दिंडीत सहभागी झाल्या आहेत. ‘धनी मला बी आषाढी वारीला येऊ द्या की’ अशी साद घालत या महिलांनी पंढरीची वाट धरली आहे. जाफ्राबाद तालुक्यातील प.पू. हभप तथा जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सोनवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या स्वग्राम पायी दिंडीत सहा ते सातशे भाविक सहभागी झाले आहेत. यात १८ ते ७० वयोगटातील महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. टेंभुर्णी, कुंभारझरी, धनगरवाडी परिसरातील महिला सकाळी लवकर उठून घर, गुरे आणि शेतीची कामे आटोपून डोक्यावर तुळशी वृंदावन व हाती टाळ घेऊन वारीत दाखल झाल्या आहेत. पांडुरंगाने वेळेवर पाऊस दिला, आता पीक हाती येईल या आशेने त्याचे आभार मानायला आणि पुढेही चांगला पाऊस मागायला वारीला आल्याची भावना पापळच्या लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर पवार यांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी पती-पत्नी दोघेही सोबत वारी करत असून काही महिला गटाने प्रवास करत आहेत. वाटेत गावातील ग्रामस्थ भाविकांसाठी पाणी, ताक, फराळ आणि विश्रांतीची व्यवस्था करत आहेत. महिलांसाठी दिंडीत स्वतंत्र व्यवस्था आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात आली आहे. या स्वग्राम पायी दिंडीत जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप नेते शालीकराम म्हस्के, पुष्पाताई म्हस्के यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले आहेत.
————————————————————
पंढरीची लागली ओढ “वर्षभर शेतात राबतो, पोरं सांभाळतो. पण आषाढीला पंढरपूरला नाही गेलो तर वर्ष व्यर्थ गेल्यासारखे वाटते. नवऱ्याला खूप आर्जव केले, तेव्हा तो म्हणाला चल मी बी येतो सोबत.” रुखमन सोनसाळे, महिला वारकरी (टेंभुर्णी) _ शेती, संसार आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या वारीत पाहायला मिळत असून टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात भाविक पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत.




