‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाला जालन्यात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे आणि अभिनेत्री श्रुती मधुदीप यांची विशेष उपस्थिती; कृष्णा मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचा विशेष खेळ हाऊसफुल्ल!

जालना/प्रतिनिधी,दि.5
सध्याच्या वास्तवाचे प्रतिबिंब दाखवणारा, कीर्तन परंपरा, प्रसिद्धीचा हव्यास आणि आजच्या बाजारू व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट जालनेकरांच्या पसंतीस उतरला. जालना येथील कृष्णा मल्टिप्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या विशेष खेळाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चित्रपटगृह हाऊसफुल्ल केले.
दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे यांच्या दमदार दिग्दर्शनातून आणि लेखनातून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरत आहे. चित्रपटातील राजलक्ष्मी ऊर्फ ‘पाच फुटाचा बच्चन’ या भूमिकेत अभिनेत्री श्रुती मधदीप यांनी प्रभावी अभिनय साकारला आहे. किशोर कदम, शशांक शेंडे यांसारख्या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाने तसेच क्षितीश दाते आणि चिन्मय सुमीत यांच्या उत्तम साथीने चित्रपटाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. निरंजन पेडगावकर यांचे संगीत आणि अभिषेक शेटे यांचे छायांकन चित्रपटाच्या आशयाला अधिक प्रभावी बनवते.
या विशेष खेळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे आणि मुख्य अभिनेत्री श्रुती मधुदीप यांनी स्वतः उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित रसिकांनी चित्रपटातील अभिनय, आशय आणि सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. चित्रपटगृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा अप्रतिम चित्रपट जालन्यातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रा. श्रीरंजन आवटे यांचे विशेष ऋण व्यक्त करण्यात आले. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या ‘शंभर शिक्षक समूहा’चे राजेभाऊ मगर, संदीप इंगोले व सर्व सहकारी, माजी प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, गुरुवर्य प्रा. बसवराज कोरे सर, नाट्य अभिनेते विनोद जैतमहाल तसेच कृष्णा मल्टिप्लेक्सचे मालक यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या आणि दर्जेदार आशयाची मेजवानी देणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाला जालन्यात मिळालेला प्रतिसाद हा निश्चितच मराठी चित्रपटसृष्टीसाठी आनंददायी आणि प्रोत्साहन देणारा ठरला आहे.




