प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात जाफराबाद तहसीलवर ‘ढोल बजाओ’ आंदोलन; तीव्र घोषणाबाजीने परिसर दणाणला.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15
जाफराबाद तालुका स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या आणि विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भातील दिरंगाईविरोधात आज जाफराबाद येथे ‘ढोल बजाओ’ आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि यशस्वीपणे पार पडले. या आंदोलनाद्वारे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल वाजवून तीव्र निषेध नोंदवला.आंदोलनाची सुरुवात शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. आंदोलनकर्त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि तेथूनच ‘ढोल बजाओ’ आंदोलनाला प्रारंभ झाला. ढोलाच्या तालावर आणि प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जाफराबाद तहसील कार्यालयावर धडकला. बोरगाव बु. सजेला कायमस्वरूपी तलाठी मिळालाच पाहिजे, रखडलेल्या कामांमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे होणारे हाल तातडीने थांबले पाहिजेत,वरुड मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी,प्रशासनाचा सुरू असलेला मनमानी कारभार थांबवून जनतेची कामे वेळेत पूर्ण व्हावीत. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, तरुण आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, तरुण आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आंदोलनकर्ते तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर जाफराबादचे तहसीलदार अविनाश लोंढे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.यावेळी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक पावले उचलण्याचे आणि मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. “आता सहन करायचे नाही, तर जाब विचारायचा!” अशी भूमिका घेत नागरिकांनी न्याय मिळेपर्यंत प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे. पोलीसांच्या चोख बंदोबस्तात आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. यावेळी सुरेश गवळी, कुंडलिक पा मुठ्ठे ,देविदास पैठणे, राजु मगरे, कृष्णा माकोडे,आनंद वाहुळे, रमेश फदाट, बबन फदाट, मोतीराम फदाट, कृष्णा फदाट, सुनील फदाट , दिलीप खंदारे, राहुल फदाट, कृष्णा फदाट,दिलीप कुटुंबरे, हर्षल फदाट,विठ्ठल चव्हाण, राजू घाडगे , दत्ता मुळे, राजू चव्हाण , विष्णू काकडे, शुभम कराडे,राजु काकडे, मोहन शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



