जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे रिक्त पदासाठी चुरस निर्माण, संचालकाचे सहाय्यक निबंधकास पत्र

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.14
जाफराबाद तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे रिक्त पद नियमबाह्य पद्धतीने भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलावून त्यातून हे पद भरण्याचे मनसुबे सत्ताधारी पक्षाने सुरू केले आहे. दरम्यान रिक्त झालेले हे पद नियमबाह्य पद्धतीने न भरता सहकारी पतसंस्था अधिनियमाच्या अधीन राहून भरावे अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे पतसंस्थेतील विरोधी पक्षाच्या सहा संचालकासह जाफराबाद तालुका शिक्षक हक्क संघर्ष समितीने एआर कडे केली आहे. याबाबत बुधवारी सहाय्यक निबंधक जाफराबाद यांना दिलेल्या लेखी निवेदनात संचालकांनी म्हटले आहे की सध्या पतसंस्थेच्या निवडणुकीला केवळ दीड वर्षाचा कालावधी राहिला असताना हे रिक्त पद भरण्याची गरजच काय. शिवाय जर रिक्त पद भरायचेच असेल तर ते पण संचालकांच्या बैठकीत भरणे नियमबाह्य आहे त्यासाठी सभासदातून निवडणूक घेऊन हे पद भरले जावे. कारण एका संचालकाच्या मृत्यूमुळे रिक्त झालेले हे पद यापूर्वी निवडणुकी द्वारेच भरले गेलेले आहे. त्यासाठी पुन्हा निवडणूक घेणे गरजेचे आहे असेही या संचालकांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान एकतर दीड वर्षासाठी हे रिक्त पद भरूच नये. भरावयाचे असल्यास सभासदातून भरले जावे. शिवाय संचालक पद भरण्यासाठी आयोजित सभेसाठी काढण्यात आलेली नोटीसही संचालकांना विहित मुदतीत दिलेली नाही. असा आरोपही या संचालकांनी केला आहे. निवेदनावर पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सुखदेव अवकाळे, संचालक संजय निकम, सुनिता खलसे, गणेश फुकट, अभिजीत साळवे, किरण तिडके, यांच्यासह जाफराबाद तालुका शिक्षक हक्क संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष नसीम शेख यांची स्वाक्षरी आहे. चौकट- जानेवारी 23 मध्ये निवडणूक झालेल्या जाफराबाद तालुका जि.प. शिक्षक पतसंस्था निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सात तर विरोधी पॅनलच्या सहा जागा निवडून आल्या होत्या. त्यात पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक विनोद कळंबे यांचे दीड महिन्यापूर्वी अपघाती निधन झाल्याने एक पद रिक्त झाले आहे. त्यानुसार आता दोन्ही गटाकडे ६-६ इतके समान बहुमत आहे. यामुळे बहुमताची जादुई फिगर पूर्ण करण्यासाठी या एका जागेला विशेष महत्त्व आल्याने भर उन्हाळ्यात यानिमित्ताने शिक्षक पतसंस्थेचे राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. फोटो – शिक्षक पतसंस्थेचे संचालक पद नियमबाह्य पद्धतीने भरण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन सहाय्यक निबंधक कार्यालयात देताना पतसंस्थेचे संचालक तथा सभासद.



