स्वातंत्र्यदिनी गोंधनखेड्यात शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 19
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जाफ्राबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला डिजिटल शाळेचे स्वरूप देण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. या उपक्रम ाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ग्रामस्थांनी तब्बल २ लाख ८९ हजार रुपयांचा निधी जमा केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेता यावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळेच्या विकासासाठी ‘शाळा ही केवळ विद्यार्थ्यांची नसून संपूर्ण गावाची जबाबदारी आहे’, या भावनेतून ग्राम स्थांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. जमा झालेल्या निधीतून शाळेत डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सुविधा
डिजिटल शाळेसाठी पहिल्याच दिवशी २.८९ लाखांचा निधी जमा
उभारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या युगाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात निधी जमा झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. व्ही. माटे यांनी केले. त्यांनी शाळेची शैक्षणिक वाटचाल, डिजिटल शिक्षणाची गरज आणि शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन व्ही. व्ही. देशमुख यांनी केले, तर आभार एस. डी. थोरात यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या स्वेच्छेच्या योगदानातून उभी राहणारी ही डिजिटल शाळा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, गोंधनखेडा ग्रामस्थांच्या एकजुटीतून ग्रामीण शिक्षणाच्या विकासाचा आदर्श निर्माण झाला आहे.

