टेंभुर्णी येथील मुख्य चौकात मोकाट कुत्र्याची दहशत ग्रामस्थ भयभीत, तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी आणि परिसर सध्या मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त झाला आहे. गावातील मुख्य चौक, गल्ल्या, शाळा परिसर आणि कचरा कुंड्यांजवळ या कुत्र्यांचे मोठे कळप पाहायला मिळत असून, यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांवर हल्लेगेल्या काही दिवसांत मोकाट कुत्र्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक पादचाऱ्यांवर आणि दुचाकीस्वारांवर धावून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच गंभीर होते. १० ते १५ कुत्र्यांच्या झुंडी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कुत्रे अंगावर धावून आल्यामुळे दुचाकी घसरून किरकोळ अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.उघड्यावरील कचरा आणि हॉटेलचे अवशेष प्रमुख कारणपरिसरातील हॉटेल, चिकन-मटण दुकानांचे उघड्यावर टाकले जाणारे अन्न आणि कचरा कुंड्यांच्या आजूबाजूला पडणारे अवशेष यामुळे या भागात कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शेजारच्या जालना शहरात वर्षभरात शेकडो नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता ग्रामीण भागातही ही दहशत पसरत चालली आहे.




