गाव तेथे अभ्यासिकाः निर्णयाचे ग्रंथालय असोसिएशनकडून स्वागत अभ्यासिकांचे संचालन सार्वजनिक ग्रंथालयांकडे देण्याची निवेदनाद्वारे मागणी; विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3
जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘गाव तेथे अभ्यासिका’ हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची दारे खुली केली आहेत. जालना जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय असोसिएशनच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, या अभ्यासिका सार्वजनिक ग्रंथालयांच्या ताब्यात दिल्यास त्याचा योग्य उपयोग होईल, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रंथालयांकडे अभ्यासिका का हवी? 1 जिल्ह्यातील ४०० हून अधिक नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांना वाचक हाताळण्याचा २५ वर्षांचा अनुभव आहे. प्रशिक्षित ग्रंथपाल आणि स्वयंसेवक उपलब्ध असल्याने नव्याने 2 भरतीची गरज नाही. 3 प्रत्येक ग्रंथालयाकडे आधीच ५ ते १० हजार पुस्तके असल्याने नवीन खरेदीचा खर्च वाचेल. ग्रंथालये रोज नियमित उघडत असल्याने अभ्यासिका बंद पडण्याचा धोका नाही. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक स्वतंत्र आणि सुसज्ज अभ्यासिका सुरू केली जाणार आहे. यात स्पर्धा परीक्षा, शालेय अभ्यास व वाचनासाठी पुस्तके, बसण्याची व्यवस्था, वीज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. गावातच अभ्यासाची शांत व पोषक जागा मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे अध्यक्ष डि बी देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेचा हा निर्णय अतिशय स्तुत्य आणि काळाची गरज आहे. अभ्यासिकांचे संचालन व व्यवस्थापन सार्वजनिक ग्रंथालयांकडे दिल्यास त्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पुस्तकांची उपलब्धता याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होईल. ग्रंथालये ही केवळ पुस्तकांची कोठारे नसून संस्कार केंद्रे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टेंभुर्णीच्या सरपंच सुमनताई म्हस्के यांनीही या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. गावात ग्रंथालय असूनही जागेअभावी मुले तिथे बसू शकत नाहीत. जिल्हा परिषदेची अभ्यासिका ग्रंथालयाला जोडून दिल्यास एकाच छताखाली पुस्तके आणि बसायला जागा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच घरात अभ्यासासाठी शांतता मिळत नसल्याने गावातच अभ्यासिका झाल्यास एमपीएससीची तयारी करणे सोपे जाईल, अशी प्रतिक्रिया दहावीतील विद्यार्थी आकाश राठोड याने दिली. _______________________________________
गाव तेथे अभ्यासिका उपक्रम राबवल्यास प्रत्येक गावातील विद्यार्थी यांना वाचनाची आवड निर्माण होते. सद्यस्थितीमध्ये मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थी वाचनापासून दूर जात असून, वाचनातून ज्ञान मिळवण्याची संकल्पना बाधित होत आहे. गाव तिथे अभ्यासिका संकल्पना राबवल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थी पुढे जाण्यास तयार होईल —रावसाहेब अंभोरे, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय टेंभुर्णी



