pub-7425537887339079
ब्रेकिंग

न्यायालयाची स्थगिती असतानाही उरण-कोप्रोलीत जमीन मोजणीचा प्रयत्न !

ऍडव्होकेट पर्जन्य म्हात्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला विरोध. बेकायदा रस्ते, वेअरहाऊस आणि उभी केलेली वाहने हटवण्याची मागणी. बेस्ट रोडवेजचे मालक जयकुमार गुप्तांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध

0 5 4 0 5 7
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19
उरण तालुक्यातील कोप्रोली गावात बेस्ट रोडवेज कंपनीचे मालक जयकुमार गजानन गुप्ता यांनी केलेल्या जमीन मोजणीच्या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. जमिनीच्या मोजणीसाठी शासकीय अधिकारी गावात दाखल होताच शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार विरोध केला. संबंधित जमीन प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाची स्थगिती असल्याने मोजणी करता येणार नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी मोजणीची कार्यवाही रोखली. मोजणी करायची असल्यास न्यायालयाचा आदेश घेऊनच यावे, असे ऍडव्होकेट पर्जन्य म्हात्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले. शेतकरी अथवा ग्रामस्थांच्या सुविधेसाठी रस्ते बनवण्यास शेतकऱ्यांची हरकत नाही मात्र व्यावसायिक कारणास्तव बनवण्यात येणारे बेकायदेशीर रस्त्यांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
बेस्ट रोडवेज कंपनीचे मालक जयकुमार गजानन गुप्ता गेल्या २० वर्षांपासून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप आहे. तब्बल १५ हून अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात दावे दाखल केले आहेत. पनवेल आणि उरण दिवाणी न्यायालयाचे आदेश असतानाही दोन प्रकरणांत आदेश झुगारून रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि गोडाऊन उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप ऍडव्होकेट पर्जन्य म्हात्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला आहे. अनधिकृत वेअरहाऊसमध्ये एखादी दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असाही सवाल शेतकरी विचारत आहेत.
शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनीत भराव टाकून काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले. यासाठी आवश्यक परवानग्या आणि रॉयल्टी भरली नसल्याचाही आरोप ऍडव्होकेट पर्जन्य म्हात्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या जागेत कंटेनर आणि टेम्पो उभे करून जमिनीचा वापर केला जात असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत उरण पोलीस ठाणे, एसीपी, डीसीपी कार्यालय, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करून तसेच मोर्चे काढूनही कारवाई झाली नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, बेस्ट रोडवेजचे मालक जयकुमार गुप्ता यांच्या एका अर्जावर पोलीस यंत्रणा तत्पर होते, अशी टीकाही आंदोलकांनी केली.
न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत जमीन मोजणी करू नये, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीतील बेकायदा रस्ते, वेअरहाऊस आणि उभी केलेली वाहने तातडीने हटवावीत, अशी मागणी आता ऍडव्होकेट पर्जन्य म्हात्रे यांच्यासह कोप्रोलीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे