जाफराबाद एसटी आगाराचे वाहकाचा प्रामाणिकपणा,४५ हजारांची बॅग परत केली महिलेची हरवलेली रोकड सुरक्षित मिळाली; कुटुंबाला मोठा दिलासा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17
जाफ्राबाद-जालना या नियोजित फेरीदरम्यान १५ जून रोजी देऊळगाव राजा बसस्थानकावर एसटी वाहक डी.पी. डिघोळे यांच्या प्रामाणिकतेचे आणि तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले. बसस्थानकावर एक महिला प्रवासी बसमध्ये चढून काही क्षणांतच उतरल्या. घाईगडबडीत त्या आपली बॅग बसमध्येच विसरल्या. बस पुढे मार्गस्थ झाल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ देऊळगाव राजा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान, जाफ्राबाद आगाराची दुसरी बस स्थानकात आल्यावर त्या बसमधील महिला वाहक श्रीमती बिसेन यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने आधी निघालेल्या बसचे वाहक डी.पी. डिघोळे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच डिघोळे यांनी वाघुळ परिसरात बसची तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांना बसमध्ये एक बॅग आढळली. बॅग उघडून पाहिल्यावर त्यामध्ये सुमारे ४५ हजार रुपये रोख रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम संबंधित महिलेने आपल्या मुलाच्या शाळेच्या फीकरिता सोबत घेतली होती. यानंतर संबंधित महिला अनिता काकडे (रा. भोसा, ता. चिखली, जि. बुलढाणा) जालना बसस्थानकावर पोहोचल्या. वाहतूक नियंत्रक, कुटुंबीय आणि आगारातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डी.पी. डिघोळे यांनी संपूर्ण रक्कम असलेली बॅग सुरक्षितपणे परत केली. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाची मोठी आर्थिक अडचण टळली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेचे आणि जबाबदारीचे ठळक उदाहरण समोर आले आहे. डी. पी. डिघोळे आणि श्रीमती बिसेन यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



