pub-7425537887339079
ब्रेकिंग

दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार : भारतीताई पोवार. महेंद्रशेठ घरत यांनीही दिबांना केले अभिवादन

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

अत्याधुनिक सेवा सुविधाने परिपूर्ण असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन सहा महिने झाले, आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमाने उडतील, परंतु दि. बा. पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला दिले गेले नाही, ही शोकांतिका आहे. कारण सरकारला दिबांच्या नावाची एलर्जी आहे. त्यांना त्यांच्या बॉसचे नाव द्यायचे आहे, अशी घणाघाती टीका १९८४ च्या गौरवशाली आणि शौर्यशाली ऐतिहासिक आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांनी दिबांना जासई येथे अभिवादन केल्यानंतर केली. आज दिबांचा स्मृतिदीन असल्याने कोल्हापूरवरून भारतीताई दिबांना अभिवादन करण्यासाठी आल्यात होत्या. जासई येथे दिबांच्या आठवणी दाटून आल्याने भारतीताई अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी पनवेल येथील ‘संग्राम’ बंगल्यावर दिबांना अभिवादन केले. सोबत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत होते. यावेळी दिबांची सून मनीषा पाटील यांनी भारतीताईंचे स्वागत केले. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, “१९८४ च्या आंदोलनावेळी मी ऐन तारुण्यात म्हणजे २३ वर्षांची होती. वयाच्या अकराव्या वर्षापासून मी शेकापची कार्यकर्ती म्हणून काम करीत होते. त्यामुळे नसानसांत आंदोलने भिनलेली होती. साहजिकच दिबांचा आदेश शिरसावंद्य मानून आंदोलनासाठी कशाचीही तमा न बाळगता आले होते. दिबांसहित बहुतांश नेते सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारला हे आंदोलन यशस्वी होईल, याची सुतराम शक्यता नव्हती. मी आल्यानंतर दहा-बारा गावांत फिरले, तिथे गुप्त बैठका घेतल्या. वाहतुकीची फार साधने नसल्याने बहुतांश गावे पायीच फिरले. हातावर पोट असणाऱ्या महिलांना जमीन संपादन विषय समजून सांगितला. सरकार कशा पद्धतीने शेतकरी वर्गाची फसवणूक करतेय आणि दि. बा. पाटील साहेब आपल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून लढत आहेत, हेही ठासून सांगितले. त्यामुळे गावोगावी आंदोलनाचे वारे पसरले. त्यामुळेच ज्या दिवशी जमीन संपादन करण्यात येणार होती, त्यास विरोध करण्यासाठी लाखो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले. सरकारला कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन चिरडायचे होते. साहजिकच पोलिस आणि एसआरपी तयारीनिशी होते. त्याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आणि बेछूट गोळीबारही केला. त्यात ५ हुतात्मे झाले. ते केवळ सरकारच्या बिनडोकपणामुळे. दि. बा. पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच शेतकऱ्यांना काहीअंशी न्याय मिळाला, कालांतराने साडेबारा टक्के जमिनीचे सूत्र देशभर लागू झाले दिबांमुळे. तसेच मंडल आयोगाचा लढाही दिबांनी यशस्वी केला. त्यामुळे ओबीसी समाजाला फायदा झाला, परंतु ओबीसी समाजाला दिबांचे महत्त्व समजलेच नाही, असे मला वाटते. दि. बा. पाटील साहेब हे देशाचे तत्वांशी जगलेले नेते, परंतु आताच्या सरकार केवळ मिंधे हवेत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून आयुष्य वेचणारा दिबांसारखा नेता चालत नाही, असे सध्याचे सरकारचे आचरण पाहता मला वाटते. वास्तविक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगीच दिबांचे नाव लागायला हवे होते, पण सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला, हे माझे ठाम मत आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळ नावासाठी जर तरुण पेटून उठले, तर मी नेतृत्वाची धुरा सांभाळायला तयार आहे, असे भारतीताई पोवार म्हणाल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, “दि. बा. पाटील साहेब आमची अस्मिता आहेत. ते देशातील अठरापगड जातींतील समाजाचे नेते होते. अशा महान लोकनेत्याचा सरकारला विसर पडला आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितले दिबांचे नाव विमानतळाला लागेल. मग उद्घाटन होऊन आणि आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण होईपर्यंत तयारी झाली आहे, तरीही दिबांचे नाव अद्याप का नाही, भूमिपुत्रांचा सरकार अंत पाहत आहे का, थोडक्यात सरकारने झोपेचे सोंग घेऊन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसलीत, हे लांच्छनास्पद आहे.” यावेळी रश्मिता पोपेटा यांनी दिबांच्या नावासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याठिकाणी भारतीताई पोवार, महेंद्रशेठ घरत यांनी भेट दिली आणि उपोषणास पाठिंबा दिला. आज सर्वपक्षीय नेत्यांनीही दिबांना अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे