समतेचा विचार, शिक्षणाचा ध्यास आणि माणुसकीचा अखंड प्रकाश—- चित्रकार संतोष औटी महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.28
काही माणसं जन्माला येतात ती स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी, पण काही माणसं जन्माला येतात ती संपूर्ण समाजाचं आयुष्य बदलण्यासाठी! अशाच महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले!
ज्या काळात समाजामध्ये जातिभेदाच्या भिंती उभ्या होत्या, स्त्रीशिक्षणाला विरोध केला जात होता, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला जात होता, त्या काळात ज्योतिराव फुले यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस केले.
त्यांनी समाजाला एक नवा विचार दिला. शिक्षण हे केवळ श्रीमंतांचे किंवा विशिष्ट वर्गाचे मक्तेदारीचे साधन नसून प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले.
सावित्रीबाई फुले यांच्या साथीने त्यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समाजाचा विरोध, अपमान आणि अनेक संकटे सहन करूनही त्यांनी शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही.
१८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समाजाला सत्य, समता, बंधुता आणि विवेकाचा मार्ग दाखवला. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि वंचित घटकांच्या वेदनांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली.
त्यांचे गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड हे ग्रंथ आजही सामाजिक वास्तवाचा विचार करायला भाग पाडतात.
महात्मा फुले यांचे कार्य केवळ इतिहासाच्या पानांमध्ये बंदिस्त करण्यासारखे नाही. कारण त्यांनी पेटवलेली विचारांची मशाल आजही समाजाला दिशा देत आहे.
आज आपण कितीही प्रगती केली, कितीही मोठ्या इमारती उभारल्या, कितीही आधुनिक झालो, तरी समाजात समानता, शिक्षण, बंधुभाव आणि माणुसकी रुजली नाही, तर त्या प्रगतीला खरा अर्थ प्राप्त होणार नाही.
फुले यांना अभिवादन करणे म्हणजे केवळ त्यांच्या प्रतिमेला हार घालणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करून आपल्या आचरणातून समतेचा समाज घडवणे होय.
त्यांच्या विचारांचा वारसा जपूया, शिक्षणाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवूया आणि माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारा समाज निर्माण करूया
अशा या महान समाजक्रांतिकारक, सत्यशोधक, शिक्षणमहर्षी आणि मानवतेचे उपासक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!



