जाफराबाद-देऊळगाव राजा मार्ग मृत्यूच्या खड्ड्यात; राजूर फाटा ते राजूर अर्धा किमी रस्ता बेपत्ता, गणपती भाविकांचे हाल
खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज येईना, यापूर्वी अनेक अपघात; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 13
जाफराबाद ते देऊळगाव राजा या महत्वाच्या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. विशेषतः राजूर फाटा ते राजूर गावापर्यंतचा सुमारे अर्धा किलोमीटरचा पट्टा पूर्णपणे उखडला गेला असून रस्त्याचे अस्तित्वच संपले आहे.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता, या अर्धा किलोमीटरच्या टप्प्यात डांबर पूर्णपणे निघून गेले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. कार, जीप सारख्या चारचाकी वाहनांनाही खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे फोटोमध्ये
यापूर्वीही झाले अपघात
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या खराब रस्त्यामुळे यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी टळली असली तरी, वेळीच दुरुस्ती न झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रसिद्ध गणपती संस्थान, भाविकांना त्रास
राजूर येथे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मोठे गणपती संस्थान आहे. दररोजच नव्हे तर विशेषतः सण-उत्सवाच्या काळात या ठिकाणी जालना, बुलढाणा, परभणी जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हाच एकमेव मुख्य रस्ता असल्याने भाविकांना या खड्डेमय रस्त्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शेतमाल बाजारात नेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक होते, मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही.
तरी प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजूर व जाफराबाद परिसरातील नागरिकांनी दिला आहे.




