मनसेच्या निवेदनाला यश ; जाफ्राबाद पंचायत समितीला अखेर गटविकास अधिकारी

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.27
जाफ्राबाद पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गटविकास अधिकारी पद रिक्त असल्याने तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या कामांवर परिणाम होत होता. विविध विकासकामे, ग्रामपंचायतींचे प्रशासकीय प्रश्न तसेच नागरिकांची कामे रखडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सरचिटणीस पंढरीनाथ म्हस्के यांनी पंचायत समिती कार्यालयात आंदोलनात्मक पवित्रा घेत गटविकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता. तसेच येत्या आठ दिवसांत गटविकास अधिकारी रुजू न झाल्यास मनसेच्या वतीने “खळखट्याक आंदोलन” करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने दखल घेत जाफ्राबाद पंचायत समितीस गटविकास अधिकारी उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रखडलेली प्रशासकीय कामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील ग्रामस्थांनी मनसेच्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.


