उरण तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल पुरो(अण्णा)यांचे देहावसान.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष तथा नागाव-म्हातवलीतील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल किशोर पुरो यांचे सोमवारी दीर्घ आजाराने देहावसान झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते. वरीष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. प्रफुल यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी उरणमधील रिक्षा वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. प्रफुल पुरो यांच्या निधनाने रिक्षा चालक-मालकांचा आधार हरपला असून नागाव आणि म्हातवली क्षेत्रातील सामाजिक कार्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रफुल यांनी दीर्घकाळ समाजसेवा केली, असंख्य गरजू व्यक्तींना मदत केली आणि आपल्या सकारात्मक वृत्तीने त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांचं साधं राहणीमान, प्रामाणिकपणा आणि समाजहितासाठी असलेलं असीम समर्पण येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. नागाव येथील अमरधाम स्मशानभूमीत प्रफुल यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा विविध क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रफुल्ल यांचे पुत्र लैलेश यांनी त्यांना अग्नी दिला. याप्रसंगी उरण तालुका रिक्षा युनियनचे पदाधिकारी रवी कोळी, म्हातवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंत घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य चारुदत्त पाटील, उरण तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष काशिनाथ गायकवाड यांनी प्रफुल्ल पुरो यांच्या आठवणींना उजाळा दिला. जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण,पत्नी, पुत्र, दोन मुली, जावई असा परिवार आहे.




