इलेक्ट्रिक बसमुळे विद्यार्थी, नोकरदार अडचणीत; टेंभुर्णीकरांचा जाफ्राबाद डेपोच्या कारभाराविरोधात संताप सकाळच्या सर्व फेऱ्या इलेक्ट्रिक बसच्या; पासधारकांना प्रवेश नाही, भाडेवाढीचा फटका – रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3
जाफ्राबाद आगाराच्या बससेवेत करण्यात आलेल्या बदलामुळे टेंभुर्णी परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत (५.३० ते ९.००) बहुतांश फेऱ्या इलेक्ट्रिक बसच्या करण्यात आल्याने मासिक पासधारकांना प्रवास करता येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असून, परिस्थिती कायम राहिल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी टेंभुर्णीहून जालन्याकडे सकाळी ५.३०, ६.३०, ७.००, ७.३० आणि ८.०० वाजता नियमित लालपरी (एसटी) बस उपलब्ध होत होत्या. या बसमध्ये विद्यार्थी सवलत, मासिक पास आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभमिळत होता. मात्र, इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाल्यानंतर सकाळच्या बहुतांश फेऱ्या इलेक्ट्रिक बसच्या करण्यात आल्या असून, केवळ सुमारे सव्वासातच्या सुमारास एकच लालपरी बस उपलब्ध असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित इलेक्ट्रिक बस शिवाई प्रकारात मोडत असल्यामुळे या बसमध्ये विद्यार्थी पास, मासिक पास किंवा ज्येष्ठ नागरिकांचे पास स्वीकारले जात नाहीत. परिणामी, पास असूनही प्रवाशांना रोख रक्कम भरून तिकीट काढावे लागत आहे. यामुळे शासनाच्या सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. भाड्यातील फरकामुळे आर्थिक ताण वाढल्याचाही मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे. पूर्वी टेंभुर्णी ते जालना या मार्गावरील लालपरी बसचे भाडे सुमारे ५० रुपये होते, तर इलेक्ट्रिक बससाठी ८० रुपये मोजावे लागत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे रोज अप डाऊन करणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदारांचा मासिक खर्च लक्षणीय वाढला आहे. एका पालकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, “माझी दोन मुले जालन्यात शिक्षण घेत आहेत. दोघांचेही मासिक पास काढले आहेत. मात्र सकाळी लालपरी बस उपलब्ध नसल्याने इलेक्ट्रिक बसने प्रवास करावा लागतो. पास चालत नसल्यामुळे रोज अतिरिक्त खर्च करावा लागतो. हा खर्च सामान्य कुटुंबासाठी परवडणारा नाही.” जालन्यात नोकरीसाठी नियमित प्रवास करणारे सुनील पाटील म्हणाले, “आम्ही मासिक पास घेतला आहे. पण सकाळच्या वेळेत त्याचा उपयोगच होत नाही. पास असूनही पुन्हा तिकीट काढावे लागते. ही व्यवस्था प्रवाशांवर अन्याय करणारी आहे.” नागरिकांनी जाफ्राबाद आगार प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्याचा दावा केला असून, समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत किमान काही लालपरी बस सुरू ठेवाव्यात, इलेक्ट्रिक बसमध्येही पासधारकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे. शिवाजीनगर बसथांब्यावर वाहतूक कॉडी टेंभुर्णीतील शिवाजीनगर परिसरात बस थांबविण्याच्या पद्धतीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचाही मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकाच ठिकाणी तीन-चार एसटी बस, खाजगी वाहने आणि मोठ्या संख्येने दुचाकी उभ्या राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून, या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. टेंभुर्णीस स्वतंत्र बसस्थानकाची मागणी टेंभुर्णी येथे अद्याप स्वतंत्र आणि सुसज्ज बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना विशेषतः रात्री मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे व्यापारी महासंघाने म्हटले आहे. या मागणीसाठी अनेक आंदोलने करूनही लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अलकेश सोमाणी म्हणाले, “टेंभुर्णीसाठी स्वतंत्र बसस्थानक ही अनेक वर्षांची मागणी आहे. गावाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार ही गरज अत्यावश्यक झाली आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.” नागरिकांनी जाफ्राबाद आगार प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या समस्येची तातडीने दखल घेऊन सकाळच्या वेळेत लालपरी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, पासधारकांना दिलासा द्यावा आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


