राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे
सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.7
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राज्य पुरस्कृत योजना सन 2026-27” राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सेद्रिंय शेती तसेच कृषी एक्स्पोचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी युरोप व चीन या देशांमध्ये अभ्यास दौरे प्रस्तावित आहेत.
योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यास एकूण 5 शेतकऱ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे, सदर निवड प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातून किमान एक महिला शेतकरी तसेच राज्य अथवा केंद्र शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांना प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे. संबंधित प्रवर्गातून पात्र अर्ज प्राप्त न झाल्यास मार्गदर्शक सूचनांनुसार इतर पात्र शेतकऱ्यांमधून निवड करण्यात येईल. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत. शासनामार्फत अभ्यास दौऱ्याच्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रुपये 2 लाख (यापैकी जी रक्कम कमी असेल) इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 14 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.
अर्जदाराकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, वैध पासपोर्ट, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेली इतर पात्रता व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पात्र प्रस्तावांची छाननी करून जिल्हास्तरावर पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात येईल. सोडतीचा दिनांक, वेळ व स्थळ याबाबतची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.




