ब्रेकिंग
उरणमध्ये ४० वर्षांनंतरही इंजिनिअरिंग कॉलेज नाही; उरणकरांच्या उदासीनतेवर प्रा. एल. बी. पाटील यांचा सवाल!
जमिनी दिल्या, आर्थिक सुबत्ता आली; मात्र स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आजही मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते इंजिनिअरिंग कॉलेजसाठी जमा झालेल्या १० ते १२ कोटींच्या निधीचे नेमके काय झाले? सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी

0
5
4
4
6
2
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
देशाच्या औद्योगिक आणि बंदर विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उरण तालुक्यात आजही इंजिनिअरिंग कॉलेज नसणे, ही अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे. १९८४ पासून तब्बल चार दशके उलटून गेली, अनेक राजकीय सत्तांतरे झाली, लोकप्रतिनिधी बदलले, विकासाची अनेक आश्वासने दिली गेली; मात्र उरणमधील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या गंभीर प्रश्नाबाबत उरणकरांना खंत का वाटत नाही? समाजातील लोकप्रतिनिधी, राजकारणी, धनिक आणि सुशिक्षित नागरिक यांची या प्रश्नाबाबतची उदासीनता कधी संपणार? असा परखड सवाल साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
१९८४ नंतर उरण तालुक्यातील अनेक नागरिकांनी जेएनपीटी (आताचे जेएनपीए) प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. या भूसंपादनामुळे अनेक कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीत बदल झाला. घराघरांत आर्थिक सुबत्ता निर्माण झाली. मुला-मुलींना उच्च शिक्षण देण्याची स्वप्ने पालक पाहू लागले. मात्र, उरणमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज नसल्याने या स्वप्नांच्या पूर्ततेसमोर मोठे आव्हान उभे राहिले. आर्थिक परिस्थिती चांगली असूनही मुलांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये पाठविण्याशिवाय पालकांकडे पर्याय राहिला नाही. प्रवास, निवास आणि शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मर्यादा आल्या, तर काहींची उच्च शिक्षणाची स्वप्ने अपूर्ण राहिली.
१९८४ नंतरची दोन ते अडीच दशके उलटून गेल्यानंतरही या प्रश्नावर ठोस उपाययोजना झाली नाही. २००८-०९ च्या सुमारास उरणमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी काही व्यक्तींनी पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे उरणकरांच्या मनात आशेचे वातावरण निर्माण झाले. या प्रकल्पासाठी १० ते १२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचीही चर्चा त्यावेळी ऐकायला मिळाली. मात्र, प्रत्यक्षात इंजिनिअरिंग कॉलेज कुठे उभे राहिले? किती निधी जमा झाला? निधी कोणाकडे जमा करण्यात आला? जमा झालेल्या पैशांचा विनियोग कशासाठी झाला? प्रकल्प रखडण्यामागील नेमकी कारणे कोणती? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
या निधीबाबत कोणावरही आरोप करण्याचा उद्देश नसून, या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती पारदर्शकपणे जनतेसमोर यावी, एवढीच अपेक्षा आहे. संबंधित व्यक्ती किंवा संस्थांनी या प्रकल्पाबाबतची अधिकृत माहिती, निधीचा तपशील आणि आजपर्यंत झालेल्या कामाची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे. कारण हा प्रश्न कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा नसून संपूर्ण उरण तालुक्यातील भावी पिढीच्या शैक्षणिक भवितव्याचा आहे.
आज २०२६ साल उजाडले, तरी उरण तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज नाही. यासाठी केवळ राजकीय पुढाऱ्यांना, आमदार-खासदारांना किंवा धनिकांना दोष देऊन चालणार नाही. समाजातील प्रत्येक सुशिक्षित नागरिकानेही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. उरणच्या विकासाच्या गप्पा मारणारे आपण शिक्षणासारख्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण विषयावर इतकी वर्षे गप्प का राहिलो? आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करण्याची जबाबदारी आपली नाही का? असा आत्मपरीक्षण करायला लावणारा सवाल प्रा. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
उरण तालुक्यात १०० ते २०० कोटी रुपये खर्च करून शैक्षणिक संस्था उभारण्याची आर्थिक क्षमता असलेले उद्योजक, धनिक आणि दानशूर व्यक्ती नाहीत असे नाही. अनेकांनी यापूर्वी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते. मात्र, हे प्रयत्न प्रत्यक्षात यशस्वी का झाले नाहीत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. उद्योगधंदे, बंदरे आणि मोठमोठे प्रकल्प असलेल्या उरण तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसणे, ही निश्चितच आत्मपरीक्षण करण्याची बाब आहे.
आता तरी उरणकरांनी जागे होण्याची वेळ आली आहे!
उरण तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्यासाठी आजवर कोणी काय प्रयत्न केले, कोणत्या अडचणी आल्या, निधी संकलन झाले असल्यास त्याचे काय झाले आणि भविष्यात कॉलेज उभारण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार आहेत, याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि सुशिक्षित नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रश्नावर एकत्र येण्याची गरज आहे.
१९८४ ते २०२६ या चार दशकांच्या कालावधीत उरणच्या किती विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उच्च शिक्षणाची संधी मिळू शकली असती? किती विद्यार्थ्यांना आर्थिक आणि भौगोलिक अडचणींमुळे आपल्या शिक्षणाच्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली आहे.
उरणच्या जमिनी प्रकल्पांसाठी गेल्या, उरणकरांनी विकासासाठी त्याग केला; मग उरणच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळणार तरी कधी? हा प्रश्न आता प्रत्येक उरणकराने विचारला पाहिजे. उरणच्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजची मागणी ही केवळ अपेक्षा नसून काळाची गरज आहे. या प्रश्नाचे सत्य शोधल्याशिवाय आणि त्यावर ठोस निर्णय झाल्याशिवाय स्वस्थ बसता कामा नये, असे मत साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील यांनी व्यक्त केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
5
4
4
6
2

