स्मार्ट मीटरची सक्ती आणि ग्राहकांना दमदाटी थांबवा —- पंढरीनाथ म्हस्के अन्यथा मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा,जाफ्राबाद महावितरणला मनसेचे निवेदन
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
जाफ्राबाद तालुक्यातील व शहरात महावितरणकडून सुरू असलेली स्मार्ट मीटरची सक्ती तसेच ग्राहकांना दिली जाणारी दमदाटी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने महावितरण (MSEDCL) प्रशासनाला जाहीर निवेदन देण्यात आले. ही सक्ती न थांबल्यास ग्राहकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती न देता ग्रामीण भागात सुमारे ७०% आणि शहरी भागात २५% स्मार्ट मीटर बसवले आहेत. या मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांची कोणतीही संमती न घेताच हे मीटर बसवण्याची धडक मोहीम राबवली जात आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्मार्ट मीटरबाबत भूमिका मांडलेली असताना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा अवमान होत असतानाही महावितरणकडून ही सक्ती सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही सक्ती लवकरात लवकर न थांबल्यास मनसे स्टाईलने मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी मनसेचे तालुका सचिव पंढरीनाथ म्हस्के यांच्यासह संजय शिंदे, संतोष पंडित, अनिल पवार,मनसे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




