
0
5
4
0
5
7
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 19
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ‘वोट बचाओ – देश बचाओ’ अभियानांतर्गत सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी काँग्रेस भवन, पनवेल येथे पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली.
AICC प्रभारी तथा जोधपूरच्या माजी आमदार मनीषा पंवार आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी राणी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांनी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मागील तीन महिन्यांच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर अहवाल उपस्थित मान्यवरांसमोर सादर केला. गेल्या तीन महिन्यांत सर्व ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून पाचशेहून अधिक नवीन BLA-2 प्रतिनिधींची नोंदणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेले निर्देश आणि पक्षाचे विविध कार्यक्रम पनवेलमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या कामगिरीबद्दल त्यांनी सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी, विविध विभागांचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले.
यावेळी मार्गदर्शन करताना मावळ लोकसभा प्रभारी राणी अग्रवाल यांनी आगामी काळात काँग्रेस पक्ष राज्यभरात संघटनात्मक ताकद वाढवून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बूथस्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
AICC प्रभारी मनीषा पंवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सत्तेत टिकून राहण्यासाठी भाजपकडून गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार कशा प्रकारे केले जात आहेत, याची विविध उदाहरणे देत सविस्तर भूमिका मांडली. लोकशाही आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सजग राहून ‘वोट बचाओ – देश बचाओ’ अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ब्लॉकस्तरीय चौपाल बैठकांचे नियोजन, SIR प्रक्रियेबाबत जनजागृती, आगामी संघटनात्मक कार्यक्रम तसेच २५ व २६ नोव्हेंबर रोजी रायगड किल्ल्यावर आयोजित संविधान दिनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युवा नेते योगेश दिवटे, प्रवीण जॉन्स, जेकब थॉमस आणि शाहरुख शेख यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पनवेलमधील काँग्रेस संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक लतीफ शेख, मिलिंद पाडगावकर, डॉ. मनीष पाटील, पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष नितीन बनसोडे , नगरसेवक शशिकला सिंग, हेमराज म्हात्रे, संतोष पवार , महेश शिंदे , चेतन म्हात्रे, सुधीर मोरे, जोस जेम्स, अरुण कुंभार, डॉ. अमित दवे, सागर पगारे, सुरेश पाटील, अखिल अधिकारी, लतीफ नालखंडे, बबन केणी, डॉ. स्वप्नील पवार, वर्षाताई शिखरे, राजेश रंजीत, अनिस इद्रेसी यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सर्व ब्लॉक अध्यक्ष, विविध विभागांचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अजय कापरे यांनी केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
5
4
0
5
7




