छत्रपती संभाजीनगर येथे 7 सप्टेंबरला डाक अदालत
डाक सेवेसंदर्भातील तक्रारी 4 सप्टेंबरपूर्वी पाठविण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.2
भारतीय डाक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत नागरिकांच्या डाक सेवेशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही डाक अदालत प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१ यांच्या कार्यालयात होणार आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन सामाजिक व आर्थिक जीवनात डाक सेवेला महत्त्वाचे स्थान आहे. नागरिकांना डाक सेवा देताना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमध्ये काही त्रुटी अथवा अडचणी निर्माण झाल्यास त्यासंदर्भातील तक्रार करण्याची संधी डाक विभागाकडून देण्यात येते. अशा तक्रारींचे योग्य प्रकारे निवारण करण्याच्या उद्देशाने डाक अदालत आयोजित करण्यात येत असल्याचे विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या डाक अदालतीमध्ये डाक विभागाशी संबंधित डाक सेवेबाबतच्या तक्रारी तसेच कामकाजाबाबतच्या तक्रारींचा विचार केला जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्रे आदी डाक सेवांशी संबंधित तक्रारी डाक अदालतीत विचारार्थ घेतल्या जाणार आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत संबंधित प्रकरणाचा संपूर्ण तपशील स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. तसेच तक्रारीचा संदर्भ क्रमांक, दिनांक व इतर आवश्यक माहिती उपलब्ध असल्यास ती नमूद करून तक्रार पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डाक सेवेसंदर्भातील तक्रारी ‘प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१’ या नावे ४ सप्टेंबर २०२६ पूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात. तसेच ४ सप्टेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची डाक अदालतीत दखल घेतली जाणार नाही, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यामुळे डाक सेवेशी संबंधित प्रलंबित अथवा निवारण न झालेल्या तक्रारी असलेल्या नागरिकांनी निर्धारित मुदतीत तक्रारी सादर करून डाक अदालतीच्या माध्यमातून त्यांचे निराकरण करून घेण्याचे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी केले आहे.



