टेंभुर्णीत चोरट्यांची अजब चोरी; काही न मिळाल्याने शेतमजुरांचे जेवणाचे डबेच पळवले!
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5
दुष्काळाच्या झळा अजून तीव्र व्हायच्या आहेत, तोवरच परिसरामध्ये चोरटे सक्रिय झाल्याची धक्कादायक आणि तेवढीच क्लेशदायक घटना टेंभुर्णी येथे घडली आहे. येथील एका शेतात चोरांनी मौल्यवान वस्तू किंवा मुद्देमाल शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र हाती काहीच न लागल्याने त्यांनी थेट रोजगारांचे (मजुरांचे) जेवणाचे डबेच पळवून नेले. या अजब चोरीमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून, शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी येथील गट नंबर ३२८ मध्ये सुखदेव खांडेभराड यांच्या शेतात सध्या सोयाबीन काढणी व मळणीचे (सोयाबीन सोडण्याचे) काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे सकाळी मजूर शेतात कामासाठी आले होते. दिवसभराच्या कष्टाच्या कामातून दुपारच्या जेवणासाठी मजुरांनी आपले जेवणाचे डबे शेतातील एका बाजूला ठेवून दिले होते.
मजूर कामात व्यस्त असताना, चोरट्यांनी शेतात डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला मौल्यवान मुद्देमाल, पैसे किंवा अन्य वस्तू शोधण्याचा चोरट्यांनी बराच प्रयत्न केला. परंतु, संपूर्ण शेतात कुठेही असा मौल्यवान ऐवज त्यांना सापडला नाही. अखेर रिकाम्या हाताने परत जाण्याऐवजी चोरट्यांनी मजुरांच्या अन्नावरच डल्ला मारला आणि तिथे ठेवलेले जेवणाचे डबेच चोरून नेले.
दुपारच्या वेळी जेव्हा भुकेने व्याकुळ झालेले मजूर जेवण्यासाठी एकत्र आले, तेव्हा त्यांना आपले डबे गायब असल्याचे समजले. आजूबाजूला शोध घेऊनही डबे न सापडल्याने चोरांनीच ते पळवल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर उन्हातानात कष्ट करणाऱ्या मजुरांच्या तोंडाचा घास अशा प्रकारे पळवला गेल्याने ही एक मोठी शोकांतिका मानली जात आहे.
अजून कडक उन्हाळा किंवा तीव्र दुष्काळाची सुरुवात झालेली नसतानाही आत्तापासूनच चोरटे अशा प्रकारे सक्रिय झाल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील कृषी पंप, केबल, शेतीचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात, मात्र आता मजुरांचे जेवणाचे डबेही सुरक्षित राहिले नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. तरी पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आर्त मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
———————————————————————-
रात्रंदिवस राबून जगाचा पोशिंदा म्हणवून घेणारा आम्ही शेतकरी आज स्वतःच्याच शेतात हतबल झालोय. पोलीस प्रशासनाने तरी आमची व्यथा समजून घ्यावी. चोरांचा बंदोबस्त करावा, एवढीच एक आर्त हाक आहे. आम्ही कोणाकडे हात पसरत नाही, फक्त आमच्या कष्टाची भाकरी आम्हाला सुखाने खाऊ द्या, एवढीच इच्छा आहे!” सुखदेव खांडेभराड शेतकरी



