pub-7425537887339079
ब्रेकिंग

सावधान! जनगणनेच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे जाळे

बनावट लिंक, खोटे फॉर्म आणि ओटीपीच्या माध्यमातून नागरिकांना टार्गेट; टेंभूर्णीचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांचे सतर्कतेचे आवाहन

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.11

सध्या सोशल मीडियावर ‘जातिनिहाय जनगणना’ आणि ‘सरकारी सर्व्हे’च्या नावाखाली बनावट फॉर्म व संशयास्पद लिंक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामार्फत नागरिकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शासनाकडून सुरू असलेल्या जनगणना आणि विविध सर्व्हे मोहिमेचा गैरफायदा घेत सायबर भामटे स्वतःला सरकारी अधिकारी किंवा एजंट असल्याचे भासवत नागरिकांशी संपर्क साधत आहेत. फोन, व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावरून “तुमची माहिती अपडेट करा”, “सरकारी लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करा” असे सांगून नागरिकांना बनावट लिंक पाठवली जात आहे. या लिंकवर क्लिक करून माहिती भरल्यानंतर आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक खाते तपशील आणि ओटीपी मिळवून खात्यातील रक्कम लंपास केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करूनही माहिती चोरी केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी सांगितले की, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. शासकीय कामासाठी केवळ अधिकृत .gov.in संकेतस्थळांचाच वापर करावा. .com, .org, .in किंवा गुगल फॉर्मसारख्या माध्यमांवरून मागवली जाणारी माहिती संशयास्पद समजावी. तसेच कोणत्याही व्यक्तीला फोनवरून ओटीपी, बँक तपशील किंवा वैयक्तिक कागदपत्रांची माहिती देऊ नये. राज्यभरात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने टेंभूर्णी पोलीस अलर्ट मोडवर आले असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल येथे ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे