“कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत संप; शेतकऱ्यांपुढे निविष्ठांचा तुटवडा उभा राहणार?”
टेंभुर्णी/दत्ता देशमुख, दि 27
जालना जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांच्या व्यापारी असोसिएशनने शासनाच्या जाचक अटी व नियमांच्या विरोधात सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपात जाफ्राबाद तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी सक्रिय सहभाग नोंदवला असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डिलर्स असोसिएशन, पुणे यांच्या पत्राला पाठिंबा देत जालना सीड्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या विविध नियमांमुळे व्यापारावर वाढत चाललेला ताण आणि संभाव्य नुकसान लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. व्यापाऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीला आळा घालणे, खत कंपन्यांकडून होणाऱ्या लिंकिंग पद्धतीला विरोध, तसेच अवैध एजंटमार्फत थेट शेतकऱ्यांना विक्री रोखण्याची मागणी आहे. याशिवाय, बियाणे विक्रीसाठी ॲप सक्ती, किरकोळ विक्रेत्यांवरील जाचक नियम, एक्सपायरी माल परत न घेणे, इन्स्पेक्टर राज वाढ आणि नव्या कायद्यांतील कठोर अटी यावरही व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संपामुळे टेंभुर्णीसह वरुड, मोहोरा, शिपोरा, भारज, जानेफळ, जवखेडा,पोखरी, डोणगाव,हिवराबळी, देळेगव्हाण, ब्रह्मपुरी, बोरी, सातेफळ फाटा, सिंधी, वरखेडा आदी गावांतील सर्व लहान-मोठे कृषी सेवा विक्रेते सहभागी झाले आहेत. दरम्यान, या बेमुदत संपाचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता असून बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी व्यापारी आणि शेतकरी वर्गातून होत आहे.


