नांदखेडा, किन्ही, काचनेरा परिसरात रात्रीला सिंगल फेज वीजपुरवठ्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13
जाफ्राबाद तालुक्यातील गट ग्रामपंचायत नांदखेडा, किन्ही व काचनेरा परिसरात रात्रीला सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अन्यथा महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच सौ. सूर्यकलाबाई गुलाबराव सवडे
यांनी दिला आहे.
याबाबत उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग, जाफ्राबाद यांना निवेदन सादर करण्यात आले. पावसाळ्यामुळे शेतात सर्प व विंचूंचा वावर वाढला असून रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच परिसरात रात्री उशिरा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने रात्री सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर उपसरपंच भरत अवचितराव जाधव, ग्रामपंचायत अधिकारी एम. आर. डोईफोडे, बाबासाहेब सवडे, सरपंच शिराळा पांडुरंग दुनगहु, पंढरीनाथ म्हस्के मनसे तालुका सरचिटणीस, दिलीपराव सवडे, विलास सवडे, सतीश सवडे, दीपक माळी, संतोष खरात, दीपक माळी, संतोष जंजाळ, ज्ञानेश्वर पवार, रतन पवार, अशोक सवडे, गजानन पवार ज्ञानेश्वर सवडे, कल्याण सवडे,यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती आमदार संतोष पाटील दानवे, तहसीलदार, जाफ्राबाद तसेच उपकार्यकारी अभियंता, टेंभुर्णी यांनाही देण्यात आल्या आहेत.




