आरटीओचे अधिकारी यांचे दुर्लक्ष

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
टेंभुर्णी (ता. जाफ्राबाद) गावकऱ्यांनी मांडलेली ही चिंता अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने आणि कर्णकर्कश हॉर्नच्या त्रासामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या समस्येवर तातडीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आणि पावले उचलता येऊ शकतात का, याकडे संबंधित अधिकारी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
टेंभुर्णी ग्रामस्थांच्यावतीने एक स्वाक्षरीचे निवेदन थेट आरटीओ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. या निवेदनात टेंभुर्णी जालना- सिंदखेडराजा मार्गावरील बेफाम धावणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह कर्णकर्कश हॉर्नच्या त्रासाला कंटाळून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जाणार आहे.
———————————————————————–
आरटीओ चे दुर्लक्ष : जाफ्राबाद आणि टेंभुर्णी या मार्गावर नियमित गस्त वाढविण्याची तसेच वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज असताना संबंधित जालना आरटीओ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर जिल्हा वाहतूक शाखा ही नावालाच असून, या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुस्ती झटकायला तयार नाही.
सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजनांची गरज
बेदरकारपणे बेफाम वाहने चालविणाऱ्यांना आवर घालण्यासाठी महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची गरज आहे. टेंभुर्णी गावाच्या हद्दीत आणि वर्दळीच्या ठिकाणी तातडीने गतिरोधक आणि झेंब्रा क्रॉसिंग टाकल्यास बेफाम वाहतुकीला निश्चितच आळा बसणार आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देवून पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्पीड ब्रेकर आणि दिशादर्शक फलक लावण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कृपया वाहन हळू चालवा, असे संदेश देणारे फलक लावण्याबरोबरच शाळा आणि दवाखान्यांचा परिसर असलेल्या ठिकाणी वाहने हळू चालवा-हॉर्न वाजवू नका, असे संदेश देणारे बॅनर किंवा फलक लावण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
