परमेश्वराशी एकरूप होऊन पूर्णत्वास प्राप्त होणे म्हणजे काला – डॉ प्रमोद कुमावत

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.5
नदी समुद्राला जाऊन मिळाली तेथे ती पूर्ण झाली, मंदिराचा कळस स्थापन झाला, काम पूर्ण झाले, हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन झाले, सप्ताह पूर्ण झाला. तसे जीवनात परमात्म्याची प्राप्ती झाली, आता जीवन पूर्ण झाले. यालाच काला म्हणतात. काला तीन प्रकारचा असतो पहिला दह्यालाह्याचा काला, दुसरा नामरूपाचा काला, तिसरा जीवब्रम्हात्मैक्याचा काला हाच काला वारकरी संप्रदायात अभिप्रेत आहे असे प्रतिपादन काल्याचे कीर्तन प्रसंगी वेदांताचार्य हभप डॉ प्रमोद महाराज कुमावत यांनी केले. गोलापांगरी येथे 27 एप्रिल ते 4 मे पर्यंत हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात हभप निवृत्ती महाराज देव्हडे,हभप प्रेममूर्ती श्रीहरी महाराज रसाळ,हभप विठ्ठल महाराज चव्हाण,विनोदाचार्य हभप वैजिनाथ महाराज पोपळघट, हभप सोपान महाराज फुके,हभप सतिश महाराज बनकर, हभप सोपान महाराज जाधव यांची कीर्तने संपन्न झाली. पुढे बोलताना डॉ प्रमोद कुमावत म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांनी सामाजिक समरसता, सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. सर्वांना एकत्रित घेऊन काम करता येते हे चरित्रातून दाखवून दिले. वारकरी संप्रदायामध्ये भेदाला स्थान नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असे तुकाराम महाराज म्हणतात. गोकुळीच्या सुखा, अंतपार नाही लेखा || बाळकृष्ण नंदाघरी, आनंदल्या नरनारी|| गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे|| तुका म्हणे छंदे, तेने मोहिले गोविंदे|| या काल्याच्या अभंगावर डॉ कुमावत यांनी निरूपण केले. गोकुळातील सुखाला परावार राहिला नव्हता कारण तेथे बाळकृष्णाचे प्राकट्य झाले होते. जिथे भगवंत असतो तिथे दुःख नसते व जिथे भगवंत नसतो तिथेच दुःख असते. लोकांना सुख हवे आहे परंतु सुखाचे साधन आवडत नाही, दुःख कुणालाच नकोय परंतु दुःखाचे कारण सुटत नाही. दुःखाचे कारण संसार आहे, संसार सुटत नाही व सुखाचे साधन भगवंत आहे, भगवंत आवडत नाही. त्यामुळे जीवनामध्ये सुखरूपता प्राप्त होत नाही. आपले जीवन शुद्ध असले पाहिजे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हा संतांचा संदेश आहे. सर्वे सुखीन: संतु सर्वे संतु निरामया: हा वेदाने दिलेला संदेश आहे. संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे या कुटुंबातील सर्वांचे कल्याण व्हावे असा संतांचा आग्रह आहे. एवढे मोठे अंत:करण व्हावे लागते तेव्हा भगवंत भेटत असतो. या सप्ताहात हभप सुरेश महाराज बोंद्रे यांचे रामायण कथा झाली तसेच रोज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ झाला. गायनाचार्य हभप मधुकर मुळे, ज्ञानेश्वर कावळे, तुकाराम कावळे, विठ्ठल नाना मोरे, अशोक सोनवणे, नरेंद्र जैस्वाल, मृदंगाचार्य हभप अजय महाराज काळे, हभप वैष्णव महाराज कावळे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री सुभाष मोरे, अण्णाभाऊ मोरे,विजय सोनवणे, बालाजी खेडकर, ज्ञानेश्वर मोरे, काकासाहेब पोपळघट यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.




