केशव शिवणी येथे दुमदुमला रामनामाचा गजर; मान्यवरांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात
लोणार/प्रतिनिधी,दि.27
दिनांक २६ मार्च रोजी देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या पावन पर्वाच्या निमित्ताने सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथे गेल्या तब्बल बावीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला श्रीराम नवमी उत्सव यंदाही अत्यंत भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. केशवराज संस्थानचे विश्वस्त तसेच मुर्डेश्वर संस्थानचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक वसंतराव उदावंत बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उत्सव दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा केला जातो.
उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावात रामनामाचा अखंड गजर दुमदुमत होता. मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटला होता, तर भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी उसळली होती. श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला ह.भ.प. झगरे गुरुजी यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून भक्ती, नैतिकता आणि संस्कारांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यानंतर प्रेमानंद महाराज देशमुख यांनी श्रीराम नवमीच्या दिवशी केलेल्या कीर्तनात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील आदर्श पुढे ठेवत माता-पित्याचे वचन पाळणे, सत्य, संयम आणि धर्मरक्षण यांचा संदेश दिला. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
तसेच रमेश महाराज जायभाये (वैष्णव गड) यांनी आपल्या काल्याच्या कीर्तनातून गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत तिचे रक्षण आणि संगोपन करण्याचे आवाहन केले. दारू व इतर व्यसनांच्या आहारी न जाता, आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून गोदुग्धाचे सेवन करावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
या भव्य सोहळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा. यामध्ये देऊळगाव राजा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, प्रख्यात वैद्यकीय तज्ञ डॉ. विजयराव नागरे, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रविण गिते, तसेच राज्यपाल देवव्रत यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त डॉ. डी. एस. शिंदे (दुसरबीड) यांचा विशेष सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
याच सन्मान सोहळ्यात ह.भ.प. गुरुवर्य त्र्यंबक बुवा सानप गुरुजी उपाख्य नाना (श्रीक्षेत्र वैष्णव गड) यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन “वारकरी भूषण” व “वारकरी रत्न” या मानपत्रांनी गौरविण्यात आले. ह.भ.प.रमेश महाराज जायभाये (श्रीक्षेत्र वैष्णव गड) यांना अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल “समाज प्रबोधन” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी (वाकदकर) यांना “समाजप्रबोधनकार” पुरस्कार देण्यात आला. विनोद वाघ यांना “गुणगौरव युवा नेतृत्व” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. डी. एस. शिंदे यांच्यासह डॉ. प्रवीण अभिमान ससाने यांना “उत्कृष्ट वैद्यकीय सेवा” पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर डॉ. विजयराव हिम्मतराव नागरे यांना “पर्यावरण प्रेमी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे डॉ. डी. एस. शिंदे यांनी असंख्य महिलांच्या कोणतीही शस्त्रक्रिया न करता यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे, याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.
कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री संजय मातोंडकर (ठाणेदार, किं.राजा) यांना “कर्तव्यदक्ष अधिकारी” पुरस्कार देण्यात आला. तसेच श्री शंकरराव उगलमुगले सर यांना “गौरव समर्पणाचा” पुरस्कार, तर श्री गजेंद्र शंकराव देशमुख यांना सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील “गौरव युवा नेतृत्व” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकजागर परिवाराचे प्रविण गीते यांना “गुणगौरव वकृत्वाचा” पुरस्कार देण्यात आला।
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी आपल्या मनोगतातून तरुण पिढीला मार्गदर्शन करताना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे, नियमित व्यायाम करण्याचे आणि प्रामाणिकपणे व्यवसाय किंवा नोकरी करून देशसेवेत योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
केशवराज संस्थानतर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक तसेच देशसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या या विशेष पुरस्काराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे।
एकूणच, केशव शिवणी येथील श्रीराम नवमी उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक जागृती, संस्कार आणि एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. गावातील एकोप्याचे आणि सांस्कृतिक परंपरेचे हे सुंदर दर्शन पाहून भाविक समाधान व्यक्त करत होते.

