जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान कीर्तनकारांनी मांडावेत – डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22
वारकरी संप्रदायामध्ये सर्व संतांनी मानवी जीवन सफल व समृद्ध करण्यासाठी मांडलेले तत्त्वज्ञान आज कीर्तनकारांनी कीर्तनाद्वारे मांडणी आवश्यक आहे. आजही समाजमनावर कीर्तनाचा प्रभाव आहे. किर्तन आजही तेवढेच प्रभावी माध्यम आहे जेवढे पूर्वी होते. मात्र आज केवळ कीर्तन मनोरंजनाचे साधन होऊ नये तर त्याद्वारे जीवन समृद्ध करणारे तत्त्वज्ञान मांडले गेले पाहिजे असे प्रतिपादन ” कीर्तन परंपरा, प्रभाव व उपयुक्तता” याविषयी असलेल्या चर्चासत्रात हभप डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांनी केले.
श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयामध्ये आयोजित भारतीय ज्ञान परंपरा व समृद्ध कीर्तन परंपरा याविषयी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर बोलत होते.
या चर्चासत्रामध्ये डॉ अशोक देशमाने बोलताना म्हणाले की अशा पद्धतीचे चर्चासत्र तालुका पातळीवर झाले पाहिजे व तालुक्यातील कीर्तनकारांचे यानिमित्ताने प्रबोधनही झाले पाहिजे. कीर्तनामध्ये सुशिक्षित तरुण यांनाही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.
डॉ राम रौनेकर यांनी या चर्चासत्रात बोलताना कीर्तनकारांचे वर्तन हे अत्यंत साधे व प्रभावी असावी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे असावे, केवळ धन कमावण्याचे कीर्तन हे साधन नाही असेही त्या आवर्जून म्हणाले.
डॉ प्रमोद कुमावत यांनी उपनिषदातील तत्त्वज्ञानाचे महत्त्व विशद करून कीर्तनाद्वारे ते तत्त्वज्ञान आजही मांडणारी परंपरा महाराष्ट्रात असल्याचे सांगितले. साखरे सांप्रदाय परंपरा, रंगनाथ गुरूजी यांची परंपरा, धुंडा महाराज देगलूरकर यांची परंपरा अशा अनेक परंपरा ज्ञानाचा प्रवाह टिकून ठेवीत आहेत. कीर्तनकारांनी अभ्यासपूर्वक कीर्तन केली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ ऋषीबाबा शिंदे यांनी आजच्या विनोदी कीर्तनकारांच्या बाबतीमध्ये समाजाने सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मोठमोठे पैशांचे व्यवहार कीर्तनाद्वारे होता कामा नये. समाजानेही कीर्तनकारांना बोलवत असताना त्यांचा अभ्यास त्यांचे वर्तन याचा विचार करून त्यांना बोलावले पाहिजे असे मत व्यक्त केले.
व्यासपीठावर संचालक डॉ अश्विन रांजणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प नारायण महाराज पिंपळे यांनी केले तर समारोप प्रशांत जाधव व भक्तीताई रणनवरे यांच्या पसायदानाने करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेली कीर्तनकार मंडळी महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी यांची उपस्थिती होती.


