‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
उरण येथील उरण गौ भक्त यांच्या वतीने आज उरणचे तहसीलदार रविंद्र सानप यांना ‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात करण्यात आले. भारतीय संस्कृतीत गाईचे असलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता सदर निवेदन देण्यात आले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून, देशभरातील ५०० हून अधिक तहसीलदारांना विविध ठिकाणी गौप्रेमी व गौभक्तांच्या वतीने अशाच प्रकारची निवेदने सादर करण्यात आली आहेत, ज्यातून या विषयाला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेला व्यापक पाठिंबा अधोरेखित होतो. यावेळी प्रतिनिधी मंडळाने उरण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील सविस्तर चर्चा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना माहिती देण्यात आली.हा उपक्रम शांततेत, कायद्याचे पालन करून आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येईल, याची माहिती प्रशासनाला देण्यात आले.सदर निवेदनात गाईला भारतीय परंपरेत “माता” म्हणून दिलेले स्थान, तिचे पोषणात्मक आणि कृषी अर्थव्यवस्थेतील योगदान यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाच्या उच्च स्तरावर पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.या उपक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. भविष्यातही जनजागृती आणि शांततापूर्ण मार्गाने हा अभियान पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी उरण मधील गौ भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.


