
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15
जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा-जानेफळ या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिक, शेतकरी आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे, चिखल तसेच पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून, या मार्गावरील एसटी बस सेवा सध्या चिंचखेडा चौफुलीपर्यंतच मर्यादित राहिली आहे. – एसटी बस गावापर्यंत येत नसल्याने चिंचखेडा येथील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज चौफुलीपर्यंत पायी जावे लागत आहे. पावसाळ्यात चिखलातून आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थिनींना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो वाहतुकीस सुरक्षित व सुकर करावा, तसेच एसटी बस सेवा पुन्हा चिंचखेडा गावापर्यंत नियमित सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



