जाफराबाद तालुक्यात वेळेत पाऊस. न झाल्यास खरीपला धोका ,, तालुक्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17
जाफ्राबाद तालुक्यात मृग नक्षत्र संपून दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविल्याने वेळेत चांगला पाऊस झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली असली तरी पावसाअभावी पेरणीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी पेरणीनंतर उगवलेली पिकेही पुरेशा ओलाव्याअभावी करपण्याच्या म ार्गावर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक शेतकरी पेरणी पुढे ढकलत आहेत. पेरणी झालेल्या शेतांमध्ये ओलावा टिकून न राहिल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच पाणवठे आटत असल्याने जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असून विहिरी व अन्य जलस्रोतांतील पाणी कमी होत असल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास रखडलेली पेरणी पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच उगवलेल्या पिकांना नवसंजीवनी मि ळून खरीप हंगामातील उत्पादन टिकवून ठेवण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना तातडीने पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि आवश्यक कृषी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. पावसाचा विलंब कायम राहिल्यास शासनाने दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सध्या जाफ्राबाद तालुक्यातील बळीराजा वेळेत चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून आकाशाकडे आशेने डोळे लावून बसला आहे.




