ब्रम्हज्ञान हेच मोक्षाला कारण असून भक्ती ज्ञानाची जननी आहे– डॉ प्रमोद महाराज कुमावत

टेंभुर्णी/ दत्ता देशमुख,दि.30
आपल्या दु:खाला कारण शरीर आहे. शरीराला कारण पापपुण्य आहे. पापपुण्याला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे . याला कारण राग द्वेष आहे. राग द्वेषाला कारण भेद ज्ञान आहे, भेदाला कारण स्वस्वरूपाचे अज्ञान आहे. अज्ञान घालविण्यासाठी भक्ती श्रेष्ठ आहे.भक्ती हीच ज्ञान वैराग्याची जननी आहे असे प्रतिपादन डॉ प्रमोद महाराज कुमावत यांनी केले आहे. सिडको एन सहा येथील विठ्ठल मंदिरामध्ये आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे त्यात ते बोलत होते. मन व इंद्रिये वासनारूप विषाने भरू देऊ नका.मन व इंद्रिये बिघडू नये म्हणून त्यांना सत्संगामध्ये ठेवले पाहिजे. सत्संगामध्ये मन इंद्रिये पुष्ट होतील. शुध्द सत्त्वगुण निर्माण होईल व त्यात ज्ञान निर्माण होईल त्यानेच कल्याण होईल. अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या या सोहळ्याचा ३१ मे पर्यंत सुरू आहे.१ जुन रोजी सकाळी १० ते १२ हभप कृष्णा महाराज आरगडे यांचे काल्याचे कीर्तनाने सोहळ्याचा समारोप होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.




