अतिक्रमण प्रकरणात मोठी घडामोड; खंडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसह दोन सदस्यांविरोधातील अहवाल सादर.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे येथील उपसरपंच प्रभाकर नारायण तुणतुणे तसेच सदस्य स्वाती संतोष चिंचकर आणि सुशील नंदकुमार वेळे यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम १४(१)(ज-३) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या विवाद अर्जात महत्त्वाची प्रगती झाली आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत खंडाळे आणि पंचायत समिती, अलिबाग यांचे अधिकृत अहवाल सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले असून, पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणाचा सातत्याने कायदेशीर पाठपुरावा भाजप अलिबाग तालुका (मध्य) सरचिटणीस तथा अॅड. आशिष अशोक बाणे यांनी केला आहे. शासकीय अभिलेखांच्या आधारे संबंधित प्रकरणाची प्रक्रिया पुढे सरकली असून, सक्षम प्राधिकरणाकडून कायद्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दाखल विवाद अर्जानुसार, संबंधित उपसरपंच आणि दोन सदस्यांवर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांबाबत सक्षम प्राधिकरणासमोर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, अंतिम निर्णय सुनावणीनंतर घेतला जाणार आहे. सध्या या प्रकरणातील आरोपांवर अंतिम निर्णय झालेला नसून, ते विचाराधीन आहेत. या कायदेशीर लढ्यात भाजपचे वरिष्ठ नेते अॅड. महेश मोहिते, अॅड. आस्वाद पाटील, संजय पाटील आणि रोशन भगत यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अॅड. आशिष बाणे यांनी सांगितले. तसेच नयनेश राऊत, सुरज राऊत, स्वप्निल बाणे आणि इतर सहकाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. अॅड. आशिष बाणे यांनी सांगितले की, हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायद्याचे पालन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कायम राहावे, या उद्देशाने सुरू आहे. प्रकरणातील वस्तुस्थिती सक्षम प्राधिकरणासमोर मांडण्यात आली असून, न्याय्य व कायद्यानुसार निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




