यशाचे सोनेरी पान: अकोलादेवच्या सुपुत्रांनी आणि स्नुषाने उंचावला गावाचा तिन्ही त्रिकोणी मान! तहसीलदार, गटविकास अधिकारी, एमबीबीएस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
अकोलादेव येथील एकनिष्ठ राहून, गरिबी आणि संघर्षाची कोणतीही पर्वा न करता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ध्येय गाठता येते, याचे उत्तम उदाहरण जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील सुपुत्रांनी आणि कन्येने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अकोलादेव सारख्या ग्रामीण भागातून एकाच वेळी प्रशासकीय आणि उच्च वैद्यकीय क्षेत्रात झेप घेतलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार नुकताच मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला.
अकोलादेवचे सुपुत्र विजय सविता केशवराव सवडे यांची तहसीलदार पदावर, तर दिपक नंदाताई बाबुराव सवडे यांची गटविकास अधिकारी पदावर निवड झाली आहे. याच सुवर्णमय प्रवासात त्यांचीच /स्नुषा सौ. मनिषा दिपक सवडे यांनी एम.बी.बी.एस. पदवी पूर्ण करत ‘ भूलतज्ज्ञ’ म्हणून यश संपादन केले आहे. एकाच गावातील आणि एकाच कुटुंबातील किंवा आप्तांच्या या नेत्रदीपक यशाने अकोलादेव गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
गुरुजनांच्या हस्ते भावनिक सत्कार
ज्या मातीमध्ये हे अधिकारी घडले, ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोलादेवच्या बाकड्यावर त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले, त्याच शाळेच्या शिक्षकांनी घेतलेला सत्कार अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त वर्गशिक्षक शेख जमीर सर, शिंदे सर, लंगोटे सर, मधुकर उखर्डे सर आणि माजी केंद्रप्रमुख सुधीर जोशी सर यांनी या कर्तृत्ववान अधिकारी व डॉक्टर दाम्पत्यांचा पुष्पगुच्छ व सत्कार करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. गुरुजनांच्या डोळ्यांत आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलचा आनंद स्पष्ट दिसत होता, तर सत्काराला उत्तर देताना अधिकारी महोदयांचे अश्रूही अनावर झाले होते.
ग्रामस्थांची आणि मान्यवरांची उपस्थिती
या कौतुक सोहळ्याला गावकऱ्यांनी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दादाराव सवडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव आटपळे, पत्रकार बी. डी. सवडे आणि आत्माराम बापू सवडे यांच्यासह गावातील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास केला, तर मोठे अधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे स्वप्न कसे सत्यात उतरू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. अकोलादेवच्या या तिन्ही कर्तृत्ववान शिलेदारांच्या यशाने आज संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, तरुणाईसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.




