pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणच्या देऊळवाडीत वटपौर्णिमेचा उत्साह; सुवासिनींनी वडाला सात फेरे घालत प्रार्थिली अखंड सौभाग्याची कामना

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

 उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29

ज्येष्ठ पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर उरणमधील देऊळवाडी परिसरात वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच देऊळवाडीतील वटवृक्षाजवळ सुवासिनींची गर्दी जमू लागली होती. नटून-थटून, नऊवारी व रंगीबेरंगी साड्या नेसून आलेल्या महिलांनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली आणि ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो’ अशी प्रार्थना करत अखंड सौभाग्याचे वरदान मागितले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मंदिराच्या आवारातील प्राचीन वटवृक्षाला हळद-कुंकू वाहून, फुले, आंबे व करवंद अर्पण करून महिलांनी वडाला कच्चा सुताचा दोरा गुंडाळत सात प्रदक्षिणा घातल्या. काही जणींनी सावित्री-सत्यवानाची कथा वाचून ऐकवली. पूजा साहित्याची परडी, फळे व ओटीचे सामान घेऊन आलेल्या महिला एकमेकींना हळदी-कुंकू लावून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत होत्या. देऊळवाडीतील या वटपूजेसाठी परिसरातील ज्येष्ठ महिला, नवविवाहितांपासून ते लहान मुलींपर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी हजेरी लावली होती. झाडाच्या पारावर ठेवलेल्या चपला व पादत्राणांचा ढीग महिलांच्या मोठ्या उपस्थितीची साक्ष देत होता. झाडाच्या सावलीत आणि भिंतीवर ‘वटपौर्णिमा’ असे लिहिलेल्या फलकामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले होते. “वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो, अशी आमची श्रद्धा आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपूजन करण्याची परंपरा आमच्या आया-आजींपासून चालत आली आहे,” अशी भावना यावेळी एका महिलेने व्यक्त केली. देऊळवाडीतील ग्रामस्थांनी व तरुण मंडळाने पूजेसाठी पाणी, मंडप व इतर व्यवस्था केली होती. पावसाळी वातावरणातही परंपरा आणि श्रद्धेचा संगम साधत उरणच्या देऊळवाडीतील वटपौर्णिमा उत्साहात पार पडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे