शिक्षक दिनानिमित्त हिंदू समाज संस्थेतर्फे शिक्षकांचा सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. याच औचित्याने हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय व रामचंद्र किनगावकर प्राथमिक विद्यालय, जालना येथे शिक्षकांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे डॉ. विनायक दसरे होते. यावेळी संस्थेचे सचिव चंद्रशेखर वाघमारे, उपाध्यक्ष भगवान धोत्रे, संचालक रावसाहेब अवघड, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा देव तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सोमिनाथ खाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस व सरस्वतीच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सन २०२५ मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी अदिती नीरज राय हिचा विशेष सत्कार करण्यात आला. रामचंद्र किनगावकर प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया मालसमींदर हिने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचाही गौरव करण्यात आला.
याशिवाय श्रीराम वाचनालय येथे आयोजित संस्कृत स्पर्धेत प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
संस्थेचे सचिव चंद्रशेखर वाघमारे यांचे वडील नारायणराव वाघमारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्व शिक्षकांना भेटवस्तू तसेच शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सोमिनाथ खाडे यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “जगामध्ये शिक्षक हा सर्वात प्रामाणिक व्यक्ती असला पाहिजे. कारण शिक्षकच देशाची भावी पिढी घडविण्याचे कार्य करतो. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या कार्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “I am first Indian and last Indian” या विचाराचा संदर्भ देत त्यांनी जात-पात व भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याला समानतेने ज्ञानदान करणे हे शिक्षकांचे प्रामाणिक कर्तव्य असल्याचे सांगितले.
शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती अनघा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी सातत्याने ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष डॉ. विनायक दसरे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाला. यावेळी विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. विनायक दसरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांचे वाचन न करता विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. शिक्षकांनीही आपल्या ज्ञानामध्ये सातत्याने वाढ केली पाहिजे. शिक्षकांचे ज्ञान जितके समृद्ध असेल, तितके विद्यार्थी अधिक सक्षमपणे घडतील. त्यामुळे ज्ञानाचा उपयोग समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप इंगोले यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्याची सुंदर परंपरा जपली गेली.

