पत्रकार विशाल वाकडे यांचे माणुसकीचे दर्शन, रक्तदान करून कोमल मोरे यांचे वाचवले प्राण

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.29
खानापूर येथील एका भगिनीला ओ निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज असताना जाफ्राबादचे पत्रकार विशाल पाटील वाकडे यांनी माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. शिर्डी साईदर्शनाहून परतत असताना आलेला फोन ऐकून त्यांनी थेट छत्रपती संभाजीनगर गाठले आणि स्वतः रक्तदान करून कोमल विष्णू मोरे या रुग्णाचे प्राण वाचवले. बुधवारी विशाल वाकडे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना खानापूरचे ऋषींद्र पाटील शेळके यांचा फोन आला. घाटी रुग्णालयात कोमल मोरे यांना ओ निगेटिव्ह रक्ताची तातडीने गरज असून असून श्री सत्य साई ब्लड बँकेतही रक्त उपलब्ध नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. शिडाहून योगायोगाने विशाल वाकडे यांचा रक्तगटही ओ निगेटिव्ह असल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी स्वतः येऊन रक्तदान करणार असल्याचे सांगितले. शिर्डीहून निघालेले वाकडे थेट छत्रपती संभाजीनगरच्या श्री सत्य साई ब्लड बँकेत पोहोचले. तिथे रक्तदान करून त्यांनी कोमल मोरे यांना वेळेत रक्त उपलब्ध करून दिले. यावेळी त्यांच्यासोबत प्रा. सचिन शिवनाथ पाटील वाकडे, मंगेश अरुण पाटील गायके आणि दीपक पाटील गायकवाड उपस्थित होते. पत्रकार विशाल पाटील वाकडे हे छत्रपती संभाजी ब्रिगेडचे जाफ्राबाद तालुकाध्यक्ष आहेत. दुर्मिळ ओ निगेटिव्ह रक्तगट असल्याने त्यांच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगानंतर बोलताना वाकडे यांनी सांगितले की, साईदर्शनाचा योग आणि रक्तदानाची संधी एकाच दिवशी आली. एका भगिनीच्या कामी येता आले, याचा मनापासून आनंद आणि सार्थ अभिमान वाटतो. ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर असला तरी रक्तपेढ्यांमध्ये तो नेहमीच तुटवड्यात असतो. याची माहिती मिळताच तातडीने दवाखान्यात हजर राहून शक्य ती सेवा उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.




