टेंभुर्णी बस थांब्यावरील अतिक्रमणावरून अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सा.बा. विभाग आणि ग्रामपंचायतीकडून जबाबदारी झटकण्याचे प्रकार, अपघाताचा धोका वाढल्याने नागरिक त्रस्त
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.7
टेंभुर्णीतील मुख्य हायवे रोडच्या शेजारी असलेल्या दुकानदारांनी बस थांब्यावर केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र या अतिक्रमणाची जबाबदारी घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तयार नाहीत. या संदर्भात विचारणा केली असता सा.बा. विभागाचे अभियंता शाम कबरे यांनी थेट जबाबदारी झटकली. हा रोड जागतिक बँकेच्या निधीतून करण्यात आला आहे, त्यामुळे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी देखील जागतिक बँकेचीच आहे, असे ते म्हणाले. रोड त्यांनी केला, त्यांनीच अतिक्रमण काढावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे हायवे रोड लगतचे अतिक्रमण हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात येते, असे स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी सांगतात. सा.बा. अधिकारी थेट जागतिक बँकेचे नाव पुढे करून हात वर करत असल्याने दोन्ही यंत्रणांमधील ढकलाढकलीत नागरिक भरडले जात आहेत. हायवे लगतच्या बस थांब्यावर दुकाने, हातगाड्या आणि पत्र्याचे शेड उभारल्याने प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. गाळेधारकांनी आणि घर मालकांनी भाड्याने दिलेल्या गाळ्याच्या समोर तब्बल २० फुटांचे पत्र्याचे शेड तयार केले आहेत. रोडच्या अगदी कडेला भाडेकरू व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने दुचाकी, चारचाकी गाड्या हायवेवरच उभ्या राहत आहेत. यामुळे बस चालकांना आणि खाजगी वाहनचालकांना मोठी समस्या निर्माण झाली असून प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. रोडवरील अपघात वाढत असल्याने शाळकरी मुले आणि वयोवृद्ध महिला प्रवाशांना बसची वाट पाहताना जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागत आहे. तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याची निर्मिती कोणीही केली असली तरी त्यावरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी ही शासन आणि स्थानिक प्रशासनाची असल्याचे सांगत नागरिकांनी आणि प्रवासी संघटनांनी शासनाने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. सर्वचजण जबाबदारी झटकत असतील तर अतिक्रमण कधी काढणार, असा सवाल उपस्थित करत शासनाने तातडीने लक्ष घालून टेंभुर्णी बस थांबा अतिक्रमणमुक्त करावा अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ धोरणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून प्रवाशांच्या ___________________
—————————————————————–
अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा “मेन जाफ्राबाद ते जालना हायवे रोडवर अतिक्रमण झाल्याने संभाव्य आपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सा.बा. विभाग व ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिले परंतु दुर्लक्ष होत आहे यामुळे दाद कोणाकडे मागवावी अशी पंचाईत झाली संबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष वेधून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा” अनेक – नागरिक,, प्रवासी, शाळेतील मुले ___________________ सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जबाबदारी निश्चित करून तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.




