साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयामध्ये शिक्षकांमध्ये चर्चासत्राचे आयोजन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2
साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयामध्ये साई ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विकासावर बोलण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे असे म्हटले. त्यानंतर शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा नवा साई पॅटर्न सुरू करण्या संदर्भात सुतवाचक केले .माध्यमिक इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक भूषण जाधव यांनी शाळेमध्ये अत्याधुनिक शिक्षणाद्वारे शाळेची विद्यार्थी संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे म्हटले. बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे यांनी डिजिटल स्कूल ची संकल्पना मांडली. माध्यमिक इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक अंकुश जोगळे यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी इंग्रजी भाषेचा वापर अनिवार्य गरजेचे आहे असे म्हटले. यावेळी शाळेच्या सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वाचनालय, प्रयोगशाळा, डिस्प्ले बोर्ड, बोलक्या भिंती, पुस्तक परीक्षण, म्युझिक सिस्टीम, प्रश्नपत्रिका छपाई संस्थेकडून व्हावी, अभ्यास डायरी, शालेय गणवेश, शालेय आय कार्ड, शाळेची जाहिरात, कृतीयुक्त शिक्षण, शिस्त, डोनेशन, शालेय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड, पगाराप्रमाणे काम करावे, मेडिटेशन, मूल्याधिष्ठित अभ्यासक्रम, ओरिएंटेशन प्रोग्रॅम, विद्यार्थ्यांचे हस्तलिखित, निसर्गातून शिक्षण, विषय खोली, जीवन शिक्षण इत्यादी विषयाबाबत चर्चा केली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी सर्व शालेय कर्मचाऱ्यांशी बोलताना विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी साई ट्रस्ट पूर्णपणे कटिबद्ध आहे असे म्हटले. साई ट्रस्ट संपूर्णपणे शिक्षकांच्या पाठीमागे उभी राहील मात्र विद्यार्थ्यांचा विकास करताना कोणत्याही शालेय कर्मचाऱ्यांनी घड्याळाकडे पाहू नये असे म्हटले. चर्चासत्राच्या शेवटी इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अंकुश जोगळे यांनी साई ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील , सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शालेय कर्मचारी यांचे चर्चासत्र यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.


