एचआयव्ही-एड्स जनजागृतीसाठी शाळेत मार्गदर्शन !

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
जालना: कै. बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालय येथे जालना आरोग्य विभागाच्या वतीनेb विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही-एड्सविषयी योग्य माहिती दिली .जालना ए.आर.टी. कार्यालयाचे समुपदेशक यांनी प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी आरोग्य विभागातील आर .बी.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही व एड्स या आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एचआयव्ही म्हणजे काय, एचआयव्ही संसर्ग आणि एड्स यातील फरक, एचआयव्हीचा प्रसार कोणत्या मार्गाने होतो तसेच कोणत्या गैरसमजांना बळी पडू नये, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय व सोप्या भाषेत माहिती दिली.
एचआयव्हीचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित आणि जबाबदार वर्तन, योग्य आरोग्यविषयक माहिती, आवश्यक वैद्यकीय तपासणी तसेच समाजात एचआयव्हीबाधित व्यक्तींशी भेदभाव न करण्याचे आवाहन त्यांनी केले. एचआयव्ही स्पर्श, हस्तांदोलन, एकत्र बसणे, जेवण करणे किंवा सामान्य सामाजिक संपर्कातून पसरत नाही, त्यामुळे एचआयव्हीबाधित व्यक्तींविषयी भीती किंवा भेदभाव न ठेवता त्यांना आधार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम. एस. कुलकर्णी होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक माहिती आत्मसात करून ती समाजातही पोहोचवावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप इंगोले यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही-एड्सविषयी असलेले गैरसमज दूर होऊन आरोग्यविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.



