0
5
0
4
2
9
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 1
उरणच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तसेच उरण शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना करताना उरण ते मोरा या मार्गावर बायपास रस्त्याची संकल्पना सुचली. या बायपास साठी अनेक संघर्ष केला. आज ते पूर्णत्वास आले. अजूनही पुढे काम करायचे आहे. बायपास रस्त्याचे खरे श्रेय मंत्री सुनील तटकरे,सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष नकुल पाटील, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना आहे. त्यांच्यामुळेच हे बायपास रस्त्याचे काम झाले आहे. या मध्ये पत्रकारांचा खूप मोठा वाटा आहे. पत्रकारांनी शेवटपर्यंत हा मुद्दा उचलून धरून पूर्णत्वास नेला. त्यांचीही भूमिका महत्वाची राहिली आहे असे सांगत सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी ज्यांनी ज्यांनी बायपास रस्त्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचे योगदाना बद्दल गौरवोदगार काढले.
उरण बायपास रस्त्याच्या निर्मितीसाठी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष, पाठपुरावा आणि प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार सोहळा उरण बायपास रोड, कोटनाका येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी गोपाळ पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण बायपास रस्त्याचे काम २०१८ च्या पूर्वीचे आहे.विविध पाठपुरावा यासाठी करावा लागला. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा.असे आवाहनही गोपाळ पाटील यांनी केले यावेळी त्यांनी उरण बायपास रस्त्याचा ईतिहास सांगितला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती भावनाताई घाणेकर आणि उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गोपाळराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष भावना घाणेकर,पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे,ऍड विजय पाटील,सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांच्या पत्नी रेश्मा पाटील,कॉम्रेड भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, चेस असोसिएशन अध्यक्ष संदीप पाटील,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, शिक्षक नेते दा.चा. कडू,सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील,कामगार नेते रवि घरत,नगरसेविका प्रमिला पवार,माजी सरपंच मानसी पाटील,महिला सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि उरण परिसराच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले.भावना घाणेकर, भूषण पाटील, विजय पाटील, महेश म्हात्रे, संतोष पवार आदी मान्यवरांनी गोपाळ पाटील यांच्या आजपर्यंतच्या कार्याचे उल्लेख करत बायपास रस्त्याचा इतिहास उलगडून सांगितला.व गोपाळ पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उरण बायपास रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोपाळराव पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले. २००८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष नकुल पाटील तसेच संबंधित लोकप्रतिनिधींकडे त्यांनी लेखी मागणी करून पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर २०१० मध्ये सिडकोकडून सुमारे २८ कोटी रुपयांची तरतूद मंजूर होऊनही काही कारणांमुळे काम रखडले. २०१६ मध्ये पुन्हा पाठपुरावा करत उपोषण आणि नोटिसांच्या माध्यमातून प्रश्नाला वाचा फोडण्यात आली. २०१८ मध्ये या कामासाठी ४२ ते ४५ कोटी रुपयांची किंमत निश्चित झाल्यानंतरही काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर २०२६ मध्ये सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळून पुलाचे काम पूर्ण झाले आणि तो जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाला.
या प्रवासात आलेल्या अडचणी, संघर्ष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला. एखाद्या सार्वजनिक विकासकामासाठी जिद्द, चिकाटी आणि लोकहिताची भावना किती महत्त्वाची असते, याचे उदाहरण गोपाळराव पाटील यांच्या कार्यातून समोर आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन उरण सामाजिक संस्था – सुधाकर पाटील (माजी आय आर एस ), आधार सावली फाउंडेशन – रेश्मा म्हात्रे, उरण उत्कर्ष समिती – दीपक गावंड, युवा सामाजिक संस्था व जासखार अध्यक्ष हर्षल ठाकूर तसेच उरण तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी केले.
या सोहळ्यामुळे उरणच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताच्या कामांना प्रोत्साहन देणारा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये पोहोचला. उपस्थित नागरिकांनी गोपाळराव पाटील यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
5
0
4
2
9



