जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांच्या सवेक्षणासाठी चार सदस्यीय पथक मंगळवारी जालन्यात –मा.आ. कैलास गोरंटयाल यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
जालना/प्रतिनीधी,दि 8
जालना शहर सुधारीत पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना व सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर या तिन्ही योजनांच्या सर्वेक्षणासाठी तज्ञ अधिकाऱ्यांचे चार सदस्यीय पथक मंगळवार दि.१२ मे रोजी जालना येथे येणार असल्याची माहिती जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देतांना गोरंटयाल म्हणाले की,उपरोक्त तिन्ही योजनांचा जागतिक बँक सहाय्यित यादीमध्ये समावेश करून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.जालना शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना शहराची झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या त्यातच जालना नगर परिषदेचे महानगरपालिकेमध्ये झालेले रूपांतर या बाबी निदर्शनास आणून देत वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास आवश्यक त्या प्रमाणात पायाभूत सुविधा शहरास उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी शहरातील भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.जालना शहराची ४ लाख २५ हजार इतकी लोकसंख्या ग्राह्य धरुन जायकवाडी योजना तयार करण्यात आली असून सदर योजनेद्वारे सध्या जालना शहरा करीता पाण्याची मागणी ही ६० MLD इतकी आवश्यक आहे व सदर योजनमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र अनुक्रमे ३५ MLD व १५ MLD नव्याने उभारणी करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. सदर योजना लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असली तरी जालना शहराची व्याप्ती झपाट्याने वाढत असून नव्याने वाड्या-वस्त्या विकसीत होत असल्यामुळे भविष्यात लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता सन २०४५ साली शहराची लोकसंख्या ५ लक्ष इतकी होण्याची शक्यता आहे. त्यावेळची पाणी मागणी ७५ MLD इतकी असू शकते व सन २०६० साली ६ लाख इतकी लोकसंख्या असू शकते, त्यामुळे २०४५ साली शहराची पाणी मागणी वाढून ७५ MLD इतकी होऊ शकते. त्यामुळे पुढील काही वर्षातच शहरातील पाणी प्रश्न पुन्हा बिकट होऊ शकतो. त्यामुळे पुढील ३० वर्षाची लोकसंख्या व पाणी मागणी विचारात घेऊन जालना शहरास नवीन पाणी पुरवठा योजना टप्पा – राबविण्याची मागणी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केली होती. जालना शहरामध्ये मध्ये वापरात येणाऱ्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरीता अमृत १ अभियाना अंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा क्र. १ मध्ये ५० द.ल.लि. क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचं काम सुरू असून, त्यामध्ये नाला वळवणे, मलशुद्धीकरण केंद्र बांधणे इतक्याच उपांगांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या शहरातील सांडपाणी हे उघड्या गटारातून वाहत असून, मुख्य नाल्यांना मिळालेलं असल्याने शहरात रोगराई व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच सध्याची लोकसंख्या ग्राह्य धरून पूढील काही वर्षांत असणाऱ्या पाणी मागणीनुसार ७५ MLD पाणी व त्यातून उत्पन्न होणारे सरासरी ६५ MLD सांडपाणी शुद्धीकरणासाठी टप्पा क्र. १ मध्ये उभारलेल्या ५० MLD मलशुद्धीकरण केंद्राव्यतिरिक्त १५ MID मलशुद्धीकरण केंद्र उभारणे गरजेचे असल्याचे तसेच संपूर्ण शहरात कलेक्शन सिस्टम पाईप अंथरूण बंदिस्त पाईपद्वारे सांडपाणी मलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहचविणे गरजेचं आहे. त्यामुळे जालना शहराकरिता टप्पा क्र. २ अंतर्गत अतिरिक्त १५ MLD मलशुद्धीकरण केंद्र उभारणे व संपूर्ण शहरात कलेक्शन सिस्टम योजना राबवणे गरजेचे आहे. तसेच जालना शहरात मोठ्या प्रमाणात स्टील उत्पादन प्रकल्प असल्या कारणाने सदर कारखानदारांना स्टील आयात व इतर उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे त्यांनी पाण्याची मागणी महानगरपालिकेकडे केलेली आहे. त्याकरीता सांडपाणी प्रकल्पातून उत्पन्न होणाऱ्या पाण्यावर Tertiary treatment करून सदर पाणी पुनर्वापरात आणण्यासाठी Tertiary treatment प्रकल्प उभारणी करणे सुद्धा आवश्यक आहे. जालना शहरास स्वच्छ व निरोगी बनविण्यासाठी आपल्या सहकार्याने सूधारीत पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना व सांडपाणो व्यवस्थापन व पुनर्वापर योजना (Tertiary treatment) या सर्व योजनांचा जागतिक बँक अर्थ सहाय्य यादीत समावेश करून या तिन्ही योजनांना प्रशासकीय मंजूरी द्यावी अशी आग्रही मागणी माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.दरम्यान, या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन जालन्यातील उपरोक्त तिन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांचे चार सदस्यीय पथक जालना येथे पाठवण्याचा निर्णय घेतला असून पथकातील अने, मृत्य, श्रीनिवास आणि रिद्धिमान या चार अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक मंगळवार दि.१२ मे रोजी जालना शहरात दाखल होणार असल्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी सांगितले.




