pub-7425537887339079
ब्रेकिंग

बाटलीतला नव्हे… वास्तवातला ‘गंगाराम’

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

चित्रपट आणि वास्तव यांच्यात खूप मोठे अंतर असते, असे आपण नेहमी म्हणतो. पण कधी-कधी एखाद्या चित्रपटातील एखादे पात्र प्रत्यक्ष आयुष्यात भेटलेल्या व्यक्तीची आठवण करून देते. प्रसिध्द अशा ‘धडाकेबाज’ या चित्रपटात लक्ष्याला बाटलीत ‘गंगाराम’ भेटतो. अगदी तसाच ‘गंगाराम’ नावाचा माणूस मला बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये भेटला होता. तेव्हा जाणवलं की, दोन्ही ‘गंगाराम’ गुणांनी जवळपास सारखेच. पण हा ‘गंगाराम’ पडद्यावरील काल्पनिक नव्हता. तर तो रक्तामांसाचा, संघर्षातून घडलेला आणि शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलासाठी झटणारा होता. साधेपणात मोठेपण शोधणारा, पदापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देणारा आणि कोणत्याही व्यक्तीशी आत्मीयतेने वागणारा हा माणूस पहिल्याच भेटीत मनात घर करून गेला. कारण बाटलीतल्या ‘गंगाराम’ला समाजातील दुर्जंनाना नष्ट करायचे होते, आणि मलकापूरच्या ‘गंगाराम’ला शैक्षणिक क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टी नष्ट करायच्या होत्या. आणखी एक बाब म्हणजे, बाटलीतला ‘गंगाराम’ लक्ष्याला जसा आपुलकीने व आत्मीयतेने बोलायचा, अगदी तसाच अनुभव मला मलकापूरच्या ‘त्या’ गंगारामचा आला होता. प्रभावी संवाद, समजून घेण्याची वृत्ती, कोणत्याही कामात पुढाकार, मदतशील स्वभाव आणि आपलेपणाची भावना या गुणांमुळे मलकापूरच्या ‘गंगाराम’चा आणि माझा स्नेह वाढला. भेटीगाठी आणि संवाद सुध्दा वाढतच गेला. अगदी आजतागायत. काही वर्षांपूर्वी एका शै​क्षणिक उपक्रमात काम करत होतो. त्यामुळे कामाचा भाग म्हणून चार दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी बुलढाण्याच्या मलकापूरात गेलो होतो. सोबतीला हरहुन्नरी तथा बहुआयामी मार्गदर्शक मित्र बाळासाहेब ठोंबरे होते. विशेष म्हणजे आम्ही दोघे आणि ‘गंगाराम’ असे तिघेही मराठवाड्यातले. त्यामुळे त्या प्रशिक्षणादरम्यान आमच्यातला संवाद अधिकच खुलला. आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा दृढ झाला. परिणामी, प्रशिक्षणापूर्वी सकाळी चहा, नाश्ता सोबत. दुपारी भोजन सुध्दा मिळूनच, आणि प्रशिक्षण सुटल्यावर सायंकाळी चहापाणी एकत्रच, असा आमचा दिनक्रम ठरलेला होता. त्यामुळे ‘गंगाराम’ यांच्याकडून अनेक बारकावे आणि पडद्यामागील व्यवस्था समजून घेता आली. शिवाय, शैक्षणिक क्षेत्रातील उणीवांचा सखोल आढावा घेता येईल. ‘व्यवस्थेपुढे शहाणपण टिकत नाही’, ही मराठी म्हण कशी प्रचिलीत झाली, याचीही रंजक काहाणी ‘गंगाराम’ यांनी आवर्जून सांगितले. तसेच व्यवस्थेत सगळे ‘मुकादम’ असतात, अर्थात वरच्याचा ‘मुका’ घ्यायचा आणि खालच्याला ‘दम’ द्यायचा, असंही ‘गंगाराम’ यांनीच नमूद केल्याचे आठवत आहे. त्या चार दिवसीय प्रशिक्षणादरम्यान मित्रवर्य बाळासाहेब ठोंबरे यांच्या आवाजातील एक से बढकर एक गीतांचे अर्थात गाण्यांचे ‘गंगाराम’ अगदी ‘फॅन’ झाले होते. त्यामुळे मलकापूर ते बुलढाणा आणि बुलढाणा ते मलकापूर या प्रवासादरम्यान ‘लालपरीत’ अर्थात एसटीमध्ये सुध्दा बाळासाहेबांनी गायलेली गाणी आजही जशीच्या तशी आठवत आहेत. म्हणूनच मित्रवर्य बाळासाहेब ठोंबरे नावाच्या व्यक्तीचा आजही आणि पुढेही कायम आदर करत आलो आहे. असो, …तर गंगाराम आल्हाट हे त्यांचं नाव, आणि जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील मौजे.पारध बुद्रक शाहूराजा हे त्यांचं गाव. गावखेड्यातल्या मध्यमवर्गीय गंगारामाच्या वाट्याला पारंपारिक समस्या आणि अडचणी आल्या. लहानपणापासूनच गरीबीशी दोन हात करून त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला. उमेदीच्या काळात शिक्षण खात्यात गटसाधन व्यक्ती म्हणून नोकरी लागली. सुरूवातील आपल्याचा तालुक्यात सेवा केली. पुढे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्याला बदली झाली. तिथेही त्यांनी इमानेइतबारे सेवा केली. शिक्षण खात्याला शिस्त लावण्यासाठी आपल्या स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न केले. पुढे अचानक त्यांची बदली थेट खानदेशात अर्थात जळगावच्या चोपडा तालुक्यात झाली. तेथेही पडेल ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने ते विदर्भात अर्थात बुलढाणा जिल्ह्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय, मलकापूर येथे गटसाधन व्यक्ती म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी विविध शैक्षणिक प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी केली. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मेहनत घेतली. नोकरीच्या कार्यकक्षेबाहेर जात अनेक उपक्रमांना पाठबळ दिले. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे शैक्षणिक प्रकल्प योग्य पध्दतीने राबविले जावेत, यासाठी पुढाकार घेतला. अधिकारी आणि शिक्षक यांच्यात समन्वय निर्माण करून भरीव योगदान दिले. काही भेटी योगायोगाने घडतात. पण त्या पुढे आयुष्यभर जपाव्याशा वाटतात. मलकापूर येथे झालेली आमची भेटही अशीच होती. कामाच्या निमित्ताने झालेली ती भेट पुढे स्नेहाच्या नात्यात बदलली, याची त्यावेळी कल्पनाही नव्हती. मित्रवर्य बाळासाहेब ठोंबरे, मी आणि गंगाराम आल्हाट आम्ही तिघेही मराठवाड्यातलेच. त्यामुळे एकाच मातीत वाढलेली माणसे भेटली की, संवादासाठी वेगळ्या परिचयाची गरज भासत नाही. काही क्षणांतच आम्ही एकमेकांचे झालो. प्रशिक्षणाचा पहिलाच दिवस संपला आणि गप्पांचा ओघ सुरू झाला. शिक्षण, समाज, प्रशासन, ग्रामीण जीवन, शिक्षकांच्या अडचणी, विद्यार्थ्यांचे भविष्य अशा अनेक विषयांवर चर्चा रंगू लागली. गंगाराम यांचे प्रत्येक वाक्य अनुभवातून आलेले असल्यामुळे त्यात कृत्रिमपणा नव्हता, तर वास्तवाचा ठसा होता. त्यांच्या बोलण्यात मोठेपणाचा आव नव्हता. समोरच्या माणसाला समजून घेण्याची वृत्ती होती. त्यामुळे त्यांच्या सहवासात असताना कधीही औपचारिकपणा जाणवत नव्हता. जणू अनेक वर्षांचा परिचय असल्यासारखे वातावरण पहिल्याच दिवशी निर्माण झाले. प्रशिक्षणाच्या चार दिवसांत आमचा एक सुंदर दिनक्रम तयार झाला. सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे भोजन, संध्याकाळचे चहापाणी आणि रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या गप्पा… या सर्व क्षणांनी मैत्रीची वीण अधिक घट्ट केली. आज अनेक वर्षांनंतरही त्या क्षणांची ऊब तशीच जाणवते. एखाद्या व्यक्तीला ओळखायचे असेल, तर त्याच्यासोबत काही वेळ घालवावा लागतो. गंगाराम यांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उलगडत गेले. ते केवळ अधिकारी अर्थात गटसाधन व्यक्ती नव्हते, तर ते संवेदनशील शिक्षक, अभ्यासू मार्गदर्शक आणि माणसांना जोडणारे व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण क्षेत्रातील अनेक पडद्यामागील बाबी त्यांनी अतिशय मोकळेपणाने सांगितल्या. विशेष म्हणजे आमच्यात संवाद होत असताना त्यांनी व्यवस्थेतील अडथळे लपवण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. उलट त्या अडचणी दूर करण्यासाठी काय करता येईल? याचाच विचार ते सातत्याने करत असल्याचे जाणवत राहिले. ‘व्यवस्थेपुढे शहाणपण टिकत नाही,’ ही प्रचलित म्हण त्यांनी ज्या संदर्भाने सांगितली, ती आजही मनात कोरली आहे. व्यवस्थेतील विसंगतीवर त्यांनी केलेले भाष्य हे केवळ टीका नव्हते. तर सुधारणा व्हावी, अशी प्रामाणिक तळमळ त्यामागे होती. शिवाय ‘व्यवस्थेत सगळे मुकादम असतात. वरच्याचा मुका घ्यायचा आणि खालच्याला दम द्यायचा,’ असेही ते मिश्कीलपणे म्हणाले होते. त्या एका वाक्यात त्यांनी अनेक वर्षांच्या अनुभवाचा सारांश मांडला होता. विनोदाच्या आडून वास्तव मांडण्याची त्यांची शैली विलक्षण होती. प्रशिक्षणातील अभ्यासाइतक्याच आठवणी त्या प्रवासातील आहेत. मलकापूर ते बुलढाणा आणि बुलढाणा ते मलकापूर या एसटी प्रवासात मित्र बाळासाहेब ठोंबरे यांनी गायलेल्या सुरेल गीतांनी वातावरण भारावून जात असे. गंगाराम त्या गीतांचे अक्षरशः चाहते झाले होते. गाणे संपल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आजही डोळ्यांसमोर उभे राहते. मैत्रीची खरी ओळख मोठ्या समारंभात होत नाही, तर ती अशा छोट्या प्रवासांत, चहाच्या कपाजवळ आणि मनमोकळ्या संवादांत होत असते. गंगाराम आल्हाट यांच्याशी जुळलेला हा स्नेह अशाच असंख्य साध्या क्षणांतून अधिक समृद्ध होत गेला. काळ पुढे सरकत गेला. प्रशिक्षण संपले. दरम्यान माझे काम आणि ठिकाण दोन्ही बदलले. शिवाय प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त झाला. पण काही नाती वेळ आणि अंतर यांच्यावर अवलंबून नसतात. गंगाराम यांच्याशी असलेला संवाद आजही तेवढ्याच आत्मीयतेने सुरू आहे. वर्षे बदलली, ठिकाणे बदलली, जबाबदाऱ्या बदलल्या. पण मैत्रीचा धागा मात्र तसाच मजबूत राहिला. तसंही प्रत्येक मोठ्या व्यक्तिमत्त्वामागे संघर्षाची एक शांत कहाणी दडलेली असते. बाहेरून दिसणाऱ्या यशामागे कितीतरी अपयश, कितीतरी त्याग आणि कितीतरी न बोललेले अश्रू दडलेले असतात. गंगाराम आल्हाट यांचाही प्रवास याला अपवाद नाही. त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला की, संघर्षानेच त्यांना घडविले आणि संस्कारांनी त्यांना मोठे केले, हे प्रकर्षाने जाणवते. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रक शाहूराजा हे त्यांचे जन्मगाव. ग्रामीण महाराष्ट्रातील इतर गावांप्रमाणेच या गावालाही अनेक समस्या होत्या. शेतीवर अवलंबून असलेले जीवन, मर्यादित साधने आणि मोठी स्वप्ने… अशा वातावरणात गंगाराम यांचे बालपण आकार घेत गेले. गरीबी ही त्यांच्या आयुष्याची कायमची सोबती होती. पण तिने त्यांच्या स्वप्नांवर कधीच सावली पडू दिली नाही. परिस्थितीशी झुंज देताना त्यांनी शिक्षणालाच आपले सर्वात मोठे शस्त्र मानले. कारण त्यांना माहीत होते की, माणसाच्या आयुष्यातील खरी क्रांती पुस्तकांच्या पानांतूनच सुरू होते. गावाकडच्या मुलाला शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो, याचा अनुभव त्यांनी जवळून घेतला. म्हणूनच पुढे शिक्षण विभागात काम करताना त्यांना प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्याच्या वेदना सहज समजल्या. कागदावरील आकडे आणि प्रत्यक्षातील वास्तव यांतील फरक त्यांनी स्वतः अनुभवला होता. त्यामुळे नोकरी मिळणे हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा नव्हता. तर तो नव्या जबाबदारीचा आरंभ होता. गटसाधन व्यक्ती म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःला एका कार्यालयापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले. सेवेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या परिसरात काम करताना शिक्षकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले. नियमांचे पालन आवश्यक आहे, पण त्यामागील मानवी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे, हा दृष्टिकोन त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत असे. जाफराबाद येथे बदली झाल्यानंतर नवीन वातावरणात अनेक आव्हाने होती. नवीन माणसे, नवीन कार्यपद्धती आणि नवीन अपेक्षा यांच्यात त्यांनी स्वतःला सहज मिसळून घेतले. कोणतीही जागा आपली करण्यासाठी पदापेक्षा स्वभाव अधिक महत्त्वाचा असतो, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्यातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे निरीक्षणशक्ती. एखादी समस्या समोर आली की, तिचे वरवरचे स्वरूप न पाहता ती नेमकी का निर्माण झाली, याचा ते शांतपणे विचार करतात. त्यामुळे त्यांच्या सूचना नेहमी व्यवहार्य आणि परिणामकारक ठरतात. तसंही शिक्षण विभागात अनेक योजना येतात, अनेक आदेश निघतात आणि अनेक उपक्रम राबविले जातात. पण एखाद्या योजनेचे खरे यश तिच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. ही बाब गंगाराम यांनी नेहमी लक्षात ठेवली. म्हणूनच त्यांनी प्रत्येक उपक्रमाकडे केवळ प्रशासकीय काम म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेली जबाबदारी म्हणून पाहिले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सेवा करतानाही त्यांनी हाच दृष्टिकोन कायम ठेवला. प्रदेश बदलला, भाषा थोडी बदलली, माणसे बदलली. पण त्यांच्या कामाची तळमळ बदलली नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांनी काम सुरू केले, तेव्हा अनेकांना एक अभ्यासू, समन्वयक आणि कामात झोकून देणारा अधिकारी लाभला. अनेक शैक्षणिक प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांनी प्रत्येक कामाकडे कर्तव्य म्हणून नव्हे, तर ध्येय म्हणून पाहिले. गंगाराम यांच्या कार्यपद्धतीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समन्वय. अधिकारी आणि शिक्षक यांच्यामध्ये अनेकदा निर्माण होणारे संवादाचे अंतर कमी करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. परस्पर विश्वासाशिवाय शिक्षण व्यवस्था सक्षम होऊ शकत नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. शिक्षकांना आदेश देणे सोपे असते. पण त्यांना प्रेरणा देणे कठीण असते. गंगाराम यांनी ही दुसरी वाट निवडली. शिक्षकांच्या अडचणी समजून घेत त्यांना सकारात्मक मार्गदर्शन करणे, हा त्यांच्या कामाचा अविभाज्य भाग बनला. नोकरीच्या चौकटीबाहेरही त्यांची धडपड सुरूच राहिली. विविध सामाजिक संस्थांनी राबविलेल्या शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी आवश्यक ते मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचावे, हीच त्यामागील त्यांची खरी प्रेरणा होती. आज त्यांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की, त्यांनी पदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. कारण काही लोक पदामुळे मोठे होतात. पण काही लोक आपल्या कार्यामुळे त्या पदालाच मोठेपण प्राप्त करून देतात. गंगाराम आल्हाट हे निःसंशयपणे त्या दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची खरी ओळख त्याच्या पदावरून होत नाही. ती त्याच्या अनुपस्थितीत लोक त्याच्याविषयी काय बोलतात, यावरून होते. गंगाराम आल्हाट यांच्याविषयी बोलताना त्यांच्या पदाचा उल्लेख नंतर येतो. आधी आठवतो तो त्यांचा साधेपणा, त्यांची आपुलकी आणि प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याची विलक्षण ताकद. म्हणूनच त्यांच्या सहवासात आलेली माणसे त्यांना अधिकारी म्हणून नव्हे, तर जिवाभावाचा माणूस म्हणून लक्षात ठेवतात. त्यांच्या आयुष्याकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, त्यांनी कधीही यशाचा गाजावाजा केला नाही. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करायचे, समाजासाठी शक्य तेवढे योगदान द्यायचे आणि पुढील पिढी अधिक सक्षम व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे, एवढेच त्यांचे जीवनसूत्र राहिले आहे. पण आजच्या स्पर्धेच्या आणि प्रसिद्धीच्या युगात अशी वृत्ती दुर्मीळ होत चालली आहे. शिक्षण ही केवळ नोकरीची बाब नाही, तर समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांकडे त्यांनी केवळ प्रशासकीय दृष्टीने पाहिले नाही, तर सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांचा विचार केला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीतच राष्ट्राच्या प्रगतीचे बीज दडलेले आहे, ही जाणीव त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येते. शिवाय माणसांशी नातं जोडण्यासाठी मोठ्या पदाची गरज नसते. तर त्यासाठी मोठ्या मनाची गरज असते. गंगाराम यांच्याकडे हे मोठेपण विपुल प्रमाणात आहे. कोणत्याही व्यक्तीशी बोलताना ते समोरच्या माणसाला पूर्ण वेळ देतात, त्याचे म्हणणे संयमाने ऐकतात आणि शक्य असेल तेथे मदतीचा हात पुढे करतात. त्यामुळे त्यांच्याशी एकदा परिचय झाला की, तो दीर्घकाळ टिकून राहतो. मलकापूरच्या त्या चार दिवसांच्या सहवासाची आठवण आजही मनात ताजी आहे. चहाच्या कपाभोवती रंगलेल्या चर्चा, शिक्षण व्यवस्थेवर झालेली चिंतनशील मांडणी, बाळासाहेब ठोंबरे यांच्या गीतांनी भारावलेले क्षण आणि त्यामधून अधिक दृढ होत गेलेली मैत्री… हे सारे आजही स्मरणात तेवढ्याच जिवंतपणे उभे राहते. काळ पुढे सरकला, ठिकाणे बदलली. पण त्या आठवणींचा सुगंध अजूनही तसाच आहे. शिवाय गंगाराम आल्हाट यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण संतुलन दिसते. कामात शिस्त आहे, पण कठोरपणा नाही. विचारांत स्पष्टता आहे, पण अहंकार नाही. स्वभावात विनोद आहे, पण हलकेपणा नाही. आणि नात्यांत आत्मीयता आहे, पण दिखाऊपणा नाही. या संतुलित स्वभावामुळेच ते प्रत्येक ठिकाणी विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. तसेच कुटुंबाबद्दल त्यांची असलेली बांधिलकीही तितकीच प्रेरणादायी आहे. नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी राहावे लागले, तरी घराशी असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. मुलींच्या यशातच वडिलांचे खरे समाधान असते, ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. आज समाजाला अशा व्यक्तींची गरज आहे, ज्या पदापेक्षा कर्तव्याला मोठे मानतात, अधिकारापेक्षा जबाबदारीला प्राधान्य देतात आणि प्रसिद्धीपेक्षा परिणामावर विश्वास ठेवतात. गंगाराम आल्हाट यांचे आयुष्य हा याच विचारांचा प्रवास आहे. संघर्षातून उभे राहूनही नम्रता न सोडणारा माणूस किती उंच जाऊ शकतो, याचे ते सुंदर उदाहरण आहेत. त्यामुळे माझ्यासाठी गंगाराम आल्हाट हे केवळ मित्र नाहीत, तर ते विचारांची देवाणघेवाण करणारे सहप्रवासी आहेत. गरज पडली की मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ आहेत. आनंदाच्या क्षणी मनापासून हसणारे आणि अडचणीच्या वेळी धीर देणारे स्नेही आहेत. अशा व्यक्ती आयुष्यात वारंवार भेटत नाहीत. पण जेव्हा केव्हा त्या भेटतात आणि तेव्हा त्या व्यक्ती आपलं आयुष्य समृद्ध करून जातात. …तर या अवलिया माणसांचा अर्थात सध्या जाफराबाद येथे गटसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेल्या गंगाराम आल्हाट यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने ‘त्या’ पहिल्या भेटीच्या प्रत्येक आठवणी नव्याने जाग्या होत आहेत. आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवून जाते. म्हणूनच त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. तसेच त्यांची सगळी स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवोत. शिवाय, त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि यशाची नवी क्षितिजे खुली होत राहावीत. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित असेच कायम राहो आणि त्यांनी जपलेली माणुसकीची श्रीमंती अधिकाधिक लोकांच्या आयुष्यात प्रकाश पेरत राहो, याच सदिच्छेहस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे