जगाला युद्ध नको बुद्ध हवा : टेंभुर्णी येथील आंबेडकर जयंती कार्यक्रमात नसीम शेख यांचे प्रतिपादन

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16
टेंभुर्णी – आज संपूर्ण जग हे अशांत असून जगात शांतता निर्माण करण्यासाठी बुद्ध व त्याच्या धम्माची सर्वांना गरज आहे. तथागत गौतम बुद्धांचे शांततावादी विचार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साम्यवादी विचारातून या जगात पुन: शांती निर्माण होऊ शकते. यासाठी आज सर्वांच्या हृदयातून युद्ध नको बुद्ध हवा हा आशावाद प्रकट होत आहे. असे विचार मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव नसीम शेख यांनी व्यक्त केले. मंगळवारी येथील नालंदा बुद्ध विहारात आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आज काही शक्तींकडून या देशात धर्मा- धर्मात व जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. जो भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशासाठी निश्चितच घातक आहे. भविष्यातील हा धोका ओळखून सर्वांनी समता, स्वातंत्र्य न्याय, बंधुता या संविधानातील तत्त्वांना आणखी बळकटी आणण्यासाठी संघटित व्हावे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
येथे उत्सव समितीतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त ११ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज आयोजित परिसंवाद कार्यक्रमात महामानवांचे मानवतावादी व समतावादी विचार काळाची गरज या विषयावर वैचारिक मंथन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच सुमन म्हस्के, तंटामुक्त समिती अध्यक्ष पी.जी. तांबेकर, आदर्श शिक्षक शेख जमीर, माजी उपसरपंच फैसल चाऊस, माजी सुभेदार प्रभू वाघमारे, पोलीस जमादार सागर शिवरकर, राहुल मघाडे, किशोर कांबळे, सिताराम गोफणे, शशिकला मघाडे, एस.व्ही.पैठणे, नसीम शेख, गौतम म्हस्के, भावसिंग खांडेभराड, दीपक शिंदे, गुड्डू मघाडे ससाने, वानखेडे आदींची मंचावर विशेष उपस्थिती होती.
यावेळी पी.जी. तांबेकर, जमीर शेख, किशोर कांबळे, पैसल चाऊस, गौतम म्हस्के आदी मान्यवरांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साम्यवादी विचारांची आज संपूर्ण विश्वाला गरज असल्याचे म्हटले. यावेळी जयंती सोहळ्या दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम चंदनशिवे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य जगन मघाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष पैठणे, उपाध्यक्ष गणेश म्हस्के, सचिव किरण कासारे यांच्यासह डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती व रमाई जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला महिला, पुरुष व शाळकरी मुलांची मोठी उपस्थिती होती. चौकट- सायंकाळी निघाली भव्य मिरवणूक दरम्यान मंगळवारी सायंकाळी सहा वाजता येथील नालंदा बुद्ध विहारापासून बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणाईने दिलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. मिरवणुकी दरम्यान ग्रामस्थांनी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या मिरवणुकीची सांगता रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ करण्यात आली. फोटो – टेंभुर्णी येथे मंगळवारी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती परिसंवाद कार्यक्रमात बोलताना मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव नसीम शेख

