भव्य उत्साहात केशव शिवणी येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा; कीर्तन, महाप्रसाद व मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला चार चाँद

जालना/प्रतिनिधी,दि.27
मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील श्री क्षेत्र केशव शिवणी येथे भगवान श्रीराम जन्मोत्सव (श्रीराम नवमी) अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव धार्मिक रंगात न्हाऊन निघाले होते. केशवराज मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
या उत्सवानिमित्त कीर्तन, भजन, धार्मिक प्रवचन आणि महाप्रसाद यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी यांच्या प्रभावी कीर्तनाने भक्तिरसाची सुरुवात झाली. त्यानंतर ह. भ. प. रमेश महाराज जायभाये यांच्या सुमधुर वाणीतील काल्याचे कीर्तन रंगून गेले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे जीवनचरित्र सांगत गोमातेच्या सेवेसाठी प्रेरणादायी संदेश दिला.
उत्सवाचा मुख्य सोहळा ह. भ. प. प्रेमानंद महाराज देशमुख यांच्या ओजस्वी कीर्तनाने पार पडला. आपल्या कीर्तनातून त्यांनी भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनमूल्यांचा उल्लेख करत माता-पिता, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सदैव सज्ज राहावे, असे प्रभावी आवाहन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन मुर्डेश्वर संस्थानचे अध्यक्ष तथा केशवराज संस्थानचे विश्वस्त वसंतराव उदावंत बंधू तसेच केशव शिवणी ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.
या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे किनगाव राजा ठाणेदार, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ, वैद्यकीय क्षेत्रात राज्यपाल पुरस्कार प्राप्त डॉ. डॉ. डी. एस. शिंदे, डॉक्टर विजयराव नागरे तसेच लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रविण गिते यांच्यासह धार्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला

