शेतीची शासकीय मोजणी म्हणजे शेतीच्या मालकीची शाश्वती – संजय मोरे पाटील
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
“शेतीची शाgसकीय मोजणी म्हणजे शेतीच्या मालकीची शाश्वती” असते असे मत ॲग्रोव्हिजन गटशेती संघांचे संस्थापक प्रमुख श्री. संजय मोरे पाटील यांनी व्यक्त केले. नळविहिरा, ता. जाफराबाद ( जि. जालना ) येथे गुरुवार ( दि. ९ जुलै ) रोजी झालेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या नियमित मासिक चर्चासत्र कार्यक्रमात मोरे पाटील बोलत होते. शेतकऱ्यांना शासकीय जमीन मोजणीचे महत्त्व पटवून देतांना ते म्हणाले की, शेतजमिनीची अधिकृत शासकीय मोजणी ही केवळ सीमारेषा निश्चित करण्याची प्रक्रिया नसून ती शेतकऱ्यांच्या मालकी हक्काला कायदेशीर बळ देणारी महत्त्वाची बाब आहे. अनेक ठिकाणी सीमावाद, अतिक्रमण, वारसाहक्काचे वाद, खरेदी-विक्रीतील अडचणी आणि न्यायालयीन प्रकरणे केवळ अचूक मोजणी नसल्यामुळे निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वेळेत आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घेणे आवश्यक आहे. मोरे पाटील यांनी पुढे सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज शासकीय मोजणी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने केली जाते. जमिनीची नोंद, सातबारा, फेरफार, बँक कर्ज, सिंचन योजना, पीक विमा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना अधिकृत मोजणी अत्यंत उपयुक्त ठरते. भविष्यात आपल्या वारसांना कोणताही वाद न होता जमीन हस्तांतरित व्हावी, यासाठी शासकीय मोजणी ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले की, “शेताची शासकीय मोजणी हा खर्च नसून आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या मालकी हक्काचे संरक्षण करणारी सुरक्षित गुंतवणूक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने शासकीय मोजणी करून आपल्या मालकीची शाश्वती निश्चित केली पाहिजे.” या मार्गदर्शनपर विषयास उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विठ्ठल खपुटे, अनिल जाधव, विष्णू जाधव, संपत जंजाळ, नारायण मेमटे, शिवाजी मोरे, गजानन मेमटे, राजेंद्र मेमटे, किशोर जंजाळ, शरद पाचरणे, भगवान खपुटे, डीगांबर खपुटे, विनोद मोरे, राजु म्हस्के, शंकर म्हस्के, विष्णू म्हस्के, मोबीन शेख, सलीम शेख सह अन्य उपस्थित होते.




