शैक्षणिक जीवनात ध्येय निश्चित करणे आवश्यक: प्रकाश पाटील.
उरण येथील पुंडलिक रामा पाटील इंग्रजी शाळेत दहावीच्या गुणवंतांचा सत्कार

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
“विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात एक निश्चित असे ध्येय ठेवले, तर यशाचे शिखर नक्कीच सर करता येते,” असा ठाम विश्वास पाणदिवे येथील पुंडलिक रामा पाटील इंग्रजी शाळेचे चेअरमन प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला. शाळेतील दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच उत्साहात पार पडला, या प्रसंगी ते बोलत होते. या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक मनोज पाटील आणि ‘महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष निलेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना आदर्श शिक्षक मनोज पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील आधुनिक बदलांचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांनी भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर धैर्याने मात करून यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या परीक्षेत शाळेतून प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये जुही दीपक पाटील (प्रथम), कौस्तुभ उल्हास पाटील (द्वितीय), कु. प्रांजल अजय गावंड (तृतीय), कु. आचल राजेश पाटील (चतुर्थ) आणि कु. साची संजय म्हात्रे (पाचवा) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका योगिता गावंड यांनी मानले.




