दिव्यांग राजकीय प्रतिनिधित्वासाठी नागपुरात राज्यस्तरीय विचार-विनिमय बैठक
नांदेडचे दिव्यांग कार्यकर्ते पटना एक्सप्रेसने नागपूरकडे रवाना

नांदेड/प्रतिनिधी,दि.1
महाराष्ट्र दिव्यांग राजकीय प्रतिनिधित्व अभियानाच्या माध्यमातून दि. २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथील आमदार निवासात राज्यस्तरीय दोन दिवसीय विचार-विनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते पटना एक्सप्रेसने नागपूरकडे रवाना झाले.
या राज्यस्तरीय बैठकीत ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर नामनिर्देशित सदस्यत्व देण्याच्या प्रमुख मागणीवर सविस्तर विचार-विनिमय करण्यात येणार आहे. दिव्यांगांच्या योजना, सुलभता, सार्वजनिक इमारती व रस्ते, निधीचा योग्य वापर तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांसारखे प्रश्न निर्णय प्रक्रियेत थेट मांडण्यासाठी दिव्यांगांचा प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे अभियानाच्या वतीने सांगण्यात आले.
आज दिव्यांग बांधवांना आपल्या प्रश्नांसाठी निवेदने देणे, अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे आणि सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मात्र ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात, त्या निर्णय प्रक्रियेत दिव्यांगांचा थेट सहभाग असणे आवश्यक असल्याची भूमिका या अभियानातून मांडण्यात येत आहे.
२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या बैठकीची प्रत्यक्ष सुरुवात रात्री ८ वाजता होणार असून, महाराष्ट्रातील विविध दिव्यांग संघटना, संस्था आणि चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या बैठकीत राज्यातील दिव्यांगांच्या व्यापक व धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा करून पुढील राज्यस्तरीय कामाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
तसेच दिव्यांगांच्या प्रश्नांचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी विविध संघटना व संस्थांच्या सामूहिक सहभागातून राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, दि. ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिव्यांगांच्या प्रमुख मागणीचे संयुक्त निवेदन देण्यात येणार असून, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या अभियानाची भूमिका व मागणी माध्यमांसमोर मांडण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातून संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील, मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे, जिल्हाध्यक्ष मनोहर येरपुरवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ शेरकुरवार, माहूर तालुका उपाध्यक्ष राजेश सुकळकर, अर्धापूर अध्यक्ष दिगंबर लोणे, गुलाब, नारायण नवले यांच्यासह अन्य कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांचा राजकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी शांततामय, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पुढील कार्यवाही करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.




