वीर वाजेकर महाविद्यालयात नर्सिंग व ऑफिस अटेंडंट कोर्स प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29
रयत शिक्षण संस्थेच्या,वीर वाजेकर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे आणि प्रथम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मल्टी फंक्शनल ऑफिस आणि नर्सिंग कोर्स यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मल्टी फंक्शनल ऑफिस आणि जनरल अटेंडंट -नर्सिंग कोर्सचे आजच्या रोजगाराभिमुख शिक्षणामधील महत्त्व अधोरेखित केले. आरोग्य सेवा क्षेत्रात तसेच कार्यालयीन व्यवस्थापनाशी संबंधित विविध संधी उपलब्ध करून देणारा हे कोर्स विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग करून स्वतःच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.सदर कोर्सच्या प्रत्येकी दोन बॅचच्या यशस्वी अंमलबजावणी आणि पूर्ततेसाठी साठी पूजा ठाकूर, पुष्पा गायकवाड व जयवंती गोंधळी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून आवश्यक कौशल्ये आत्मसात केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. राम गोसावी व प्रा. देवेंद्र कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमात कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र स्वीकारताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. सी. डी. धिंदळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट, कोर्सची उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. राम गोसावी यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.या प्रमाणपत्र वितरण समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळाली असून भविष्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.




