महाप्रजापती संस्थेद्वारे नशामुक्ती मार्गदर्शन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22
हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयात महाप्रजापती संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करून निरोगी व संस्कारक्षम जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मार्गदर्शन करताना व्यसनांमुळे शरीर, मन, कुटुंब आणि सामाजिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. सिगारेट, तंबाखू, गुटखा आदी व्यसनांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन कर्करोगासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून कायम दूर राहावे, असा संदेश देण्यात आला.
“एकीकडे मोबाइल, पैसा आणि आधुनिक साधने आहेत; तर दुसरीकडे संस्कार, आरोग्य आणि चारित्र्य आहे. जीवनातील वेळ व ऊर्जा विधायक कार्यासाठी वापरा,” असे आवाहन करण्यात आले. तसेच तणाव आणि व्यसनाधीनता कमी करण्यासाठी ध्यानधारणा (मेडिटेशन), योग, वाचन, खेळ आणि विविध सकारात्मक उपक्रमांचा आधार घेण्याचा सल्ला देण्यात आला.
मोबाइलचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञान, शिक्षण आणि चांगल्या गोष्टींसाठी करावा, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


